विटा : पुढारी वृत्तसेवा: थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी भरली नाही, म्हणून सांगली जिल्ह्यातील आळसंद (ता.खानापूर) ग्रामपंचायतीने बीएसएनएलच्या कार्यालयाला टाळे ठोकले. ही कारवाई सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी आज (दि. ४) केली.
या कारवाईबाबत सरपंच अजित जाधव म्हणाले की, आळसंद ग्रामपंचायत बीएसएनएलच्या स्थानिक कार्यालयात पाणीपुरवठा करीत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतचे घरपट्टी आणि पाणीपट्टी बीएसएनएल कार्यालयाने वेळेवर भरणे अपेक्षित आणि आवश्यक आहे. मात्र, बीएसएनएलचे अधिकारी टोलवाटोलवी करतात. त्यांच्याकडे एकूण १ लाख ४ हजार ४६२ रुपये थकीत आहे. ही रक्कम ग्रामपंचायतीने वेळोवेळी भरण्यासाठी विनंती केली.
ग्रामपंचायतीची महावितरण कार्यालयाकडे ९ लाख ४० हजार २९४ रुपये, आयडिया (टॉवर) कंपनीकडे ७५ हजार ५८९ रुपये, एअरटेल (टॉवर) कंपनीकडे १५ हजार ५५४ रुपये, घरपट्टी आणि पाणीपट्टी कर थकीत आहेत. हे देणे संबंधित कंपन्यांनी त्वरित द्यावेत, अन्यथा त्यांच्यावरही आम्हाला नाईलाजाने कारवाई करावी लागेल, असेही सरपंच जाधव यांनी म्हटले आहे.
या कारवाईत सरपंच अजित जाधव यांच्यासह उपसरपंच पोपट बरबट्टे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश कारंडे, सत्यवान शिरतोडे, निलेश जाधव, रघुनाथ मिटकरी, संतोष जाधव, संदीप जाधव, महादेव माळी, ग्रामविकास अधिकारी बी. आर. शिंदे आदीसह माजी सरपंच किरण कचरे, सोमनाथ कदम, कर्मचारी आदींनी सहभाग घेतला.
हेही वाचा