मांजर्डे : तासगाव तालुक्यात वनविभागाच्या वतीने मंजूर झालेली कोट्यवधींची कामे मजूर संस्थांना न देता ती परस्पर दुसऱ्यांनीच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित संस्थांची केवळ 5 ते 10 टक्के रक्कम देऊन बोळवण करण्यात आल्याची जोरदार चर्चा असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील आरवडे, जरंडी, वडगाव आणि डोंगरसोनी या गावांमध्ये वनविभागाच्या वतीने जवळपास 14 कामांसाठी 60 लाख रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने बंधारे बांधणे, वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदणे, रोपवाटिका दुरुस्ती करणे यांसह अन्य कामांचा समावेश आहे. ही कामे वाटप करताना अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील काही मजूर सोसायट्यांना ती दिली. मात्र, प्रत्यक्षात काम करताना अनेक ठिकाणी ज्या संस्थेच्या नावे काम मंजूर झाले आहे, त्यांनी ते केलेलेच नाही. अनेक संस्था या कामांबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहेत.
अशा परिस्थितीत ही कामे नेमकी कोणी केली, याची माहिती प्रशासनाकडून मिळू शकलेली नाही. संबंधित विभागाचे अधिकारी आणि काही कंत्राटदार यांनी संगनमताने हा गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या सर्व 14 कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याबाबत सांगली येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.