पाण्याअभावी अनेक शेतातील ऊस पिवळसर पडून वाळू लागला आहे. Pudhari
सांगली

Sangli News : बागायतदार, शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

सव्वा लाख हेक्टर ऊस पाण्याच्या प्रतीक्षेत; आगाप सोयाबीन, भाजीपाला संकटात

पुढारी वृत्तसेवा

विवेक दाभोळे

सांगली : अल्‌ निनोमुळे पाऊस लांबला आहे, तर धरणांतील पाणीसाठा अत्यंत मर्यादित राहिला आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने कृष्णा, वारणा नद्यांवर शेतीसाठी उपसा मर्यादित केला आहे. यामुळे या दाेन्ही नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेला आणि सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील मिळून तब्बल सव्वा लाख हेक्टरमधील ऊस पाण्याच्या प्रतीक्षेत उभा आहे. आता पाऊस पडेपर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याने होणाऱ्या नुकसानीच्या धास्तीने ऊस बागायतदार शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. याखेरीज भाजीपाला तसेच आगाप सोयाबीनयासारखी पिके पाण्याच्या प्रतीक्षेत शेतात केविलवाणीपणे उभी आहेत.

सातासमुद्रापार दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीवर अथांग प्रशांत महासागरात धुमसत असलेला अल्‌ निनो सांगली जिल्ह्यातील शेतीच्या मुळावर आल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. अल्‌ निनोच्या अवकृपेने यावेळी पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्या पिकांना पाण्याची मागणी वाढू लागली आहे. काही वर्षांपासून सातत्याने भासत असलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासन खास करून उसासाठी ठिबक सिंचन प्राधान्याने वापरण्याचे आवाहन करत आहे.

सांगली जिल्ह्यात साधारणत: १ लाख १५ हजार २४२ हेक्टर क्षेत्र ठिबकखाली आहे. तीव्र उन्हाळा आणि अल्‌ निनोमुळे वर्तविण्यात आलेला ४३ टक्के कमी पावसाचा अंदाज यामुळे ठिबक पध्दती आता गरजेची बनली आहे. आता तर ठिबकचा टक्का अधिक वाढणे गरजेचे आणि आवश्यक बनले आहे. पाणी टंचाईचे काळे ढग दाट झाले आहेत. कृष्णा-वारणा नद्यांवर शेतीच्या पाण्यासाठी उपसाबंदी लादण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतातील उभ्या ऊस पिकाला पाणीच देता येत नाही. परिणामी उसाचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. पाऊस लवकर आला तर ठीक, अन्यथा उसाच्या नुकसानीचे प्रमाण वाढतच जाणार आहे. शेतीवर आता पाणीटंचाईचे सावट आहे. ठिबकचा वापर हा पिकांना गरजेइतकाच पाणी देण्यासाठी प्रभावीपणे होतो. यातून पाण्याची ४० टक्केपर्यंत बचत होऊ शकते. त्याचप्रमाणे कमी पाण्यात जादा क्षेत्र ओलिताखाली येते. ठिबकसाठी एकरी २५ हजारापासून ४० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.

सांगली जिल्ह्यात सध्या जवळपास १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रात उसाचे पीक आहे. यातील सर्वाधिक क्षेत्र हे वाळवा तालुक्यात असून या ठिकाणी २६ हजार ६०३ हेक्टर ऊस आहे. याखालोखाल मिरज तालुक्यात १५ हजार ३३७ हेक्टर ऊस असून पलूस तालुक्यात १४ हजार ११८ हेक्टर ऊस आहे. पूर्व भागात जत तालुक्यात १३ हजार ७६५ हेक्टर ऊस आहे. याखेरीज अन्य तालुक्यात देखील उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. ही सर्वच आकडेवारी सोबतच्या चौकटीत दिली आहे.

आडसालीचा टक्का घटला

यावेळी पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. परिणामी जून महिन्यापासून सुरू होणारी आडसाली लावणीची लगबग शिवारात फारशी दिसत नाही. परिणामी पावसाअभावी आडसालीचे क्षेत्र घटले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील (२५-२६) हंगामात सततच्या पावसाने शेतकरी आडसाली लावण करू शकला नव्हता, तर यावेळी अवर्षणाने आडसालीस ‘ब्रेक’ लागला आहे. अर्थातच सध्या शेतात उभ्या असलेल्या पिकांचे उपसा बंदीने मोठेच नुकसान होऊ लागले आहे. यासाठी शेतकरी डोळ्यात जीव आणून पावसाची प्रतीक्षा करत आहेत.

जिल्ह्यात कृष्णा - वारणाकाठी अनेक शेतकऱ्यांनी आगाप सोयाबीनचे पीक घेतले आहे. मात्र उपसाबंदी लागू करण्यात आल्याने वाढीच्या अवस्थेत असलेले हे कोवळे सोयाबीनचे पीक तीव्र उन्हाने होरपळू लागले आहे. कोवळे पीक वाळू लागल्याने शेतकऱ्यांच्या मनात कालवाकालव होऊ लागली आहे. आठवडाभर कसे तरी हे पीक तग धरेल, मात्र तोपर्यंत जर पाऊस झालाच नाही, तर या पिकांवरून शेतकऱ्यांना नाईलाजाने नांगरच फिरवावा लागणार आहे. केलेला एकरी तीस-पस्तीस हजार रुपयांचा खर्च पाण्यातच जाणार आहे.

सातासमुद्राच्या पार जगाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात अथांग महासागराच्या तळाशी खळखळ करत असलेला अल्‌ निनो सांगली जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या मुळावर उठला आहे. अल्‌ निनोमुळे यावेळी तब्बल ४३ टक्के पाऊस कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र या अंदाजाने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्याच्या उरातील धडधड वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तब्बल अडीच लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचा पेरा अनिश्चिततेच्‍या भोवऱ्यात सापडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT