सांगली : येथील शिवशंभो चौक ते ईश्वरपूरकडे जाणाऱ्या बायपास रोडवरील आदित्य ॲग्रो एजन्सी या दुकानात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल ६ लाख ७९ हजार ९५० रुपये किमतीचे शेती साहित्य आणि सुटे भाग चोरून नेले. ही घटना ८ सप्टेंबरच्या सायंकाळपासून ९ सप्टेंबरच्या सकाळच्या दरम्यान घडली.
याबाबत बाबासाहेब गणपती गोडसे (वय ४६, रा. कर्नाळ रोड, दत्तनगर, सांगली) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने दुकानाच्या पत्र्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
दुकानातील ६७ हजार ५०० रुपयांच्या शेती पंपाच्या बॅटऱ्या, २० हजार ८०० रुपयांच्या मोटारी, फॉगर मशीन, ५० शेती पंप, इंजेक्टर, एमएस पाईपचे बंडल आणि २९ हजार ५०० रुपयांचे वायरिंग साहित्य असा एकूण ६ लाख ७९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.