सांगली : पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या पुढारी ‘अॅग्रिपंढरी’ या भव्य पीक प्रात्यक्षिक प्रदर्शनाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, विशेषतः पीक प्रात्यक्षिक विभागाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 20 ते 23 फेबुवारी 2026 दरम्यान सांगलीत होणाऱ्या या प्रदर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दै. पुढारी माध्यम समूह आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, “ऑर्बिट क्रॉप न्यूट्रीएंट” हे मुख्य प्रायोजक आहेत. प्रत्यक्ष शेतात घेतलेली पिके पाहण्याची संधी हे या प्रदर्शनाचे सर्वात मोठे आकर्षण आहे.अशा प्रकारचे प्रत्यक्ष पीक प्रात्यक्षिक बारामतीनंतर महाराष्ट्रात प्रथमच सांगलीत होत आहे. नोव्हेंबर महिन्यात जमिनीची मशागत पूर्ण झाल्यानंतर, आता प्लास्टिक मल्चिंग वर सर्व रोपांची पुनर्लागण पूर्ण झाली आहे. प्रदर्शनाच्या चार दिवसांत शेतकऱ्यांना 40 हून अधिक पिके पूर्ण वाढलेल्या आणि जोमदार स्थितीत पाहता येणार आहेत. यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी पुरवठादार कंपन्या आणि प्रगतशील शेतकरी या प्रदर्शनाकडे डोळे लावून बसले आहेत.
प्रदर्शनात आपले तंत्रज्ञान आणि उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी राज्यातून तसेच परराज्यातूनदेखील कृषी कंपन्या येणार आहेत. स्टॉल विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला असून आता केवळ मोजकेच स्टॉल शिल्लक राहिले आहेत. हजारो शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याची ही सुवर्णसंधी असल्याने, उर्वरित स्टॉलसाठी व्यावसायिकांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.