सांगली : आम्ही आदित्यराजेंना दत्तक घेतले असून, तेच सांगली संस्थानचा वारसा सक्षमपणे पुढे चालवतील. कुटुंबाच्या व संस्थानच्या नावाने दिशाभूल करून पैसे उकळणाऱ्यांपासून सांगलीकरांनी सावध राहावे, असे राणीसाहेब राजलक्ष्मीराजे पटवर्धन यांनी येथे सोमवारी स्पष्ट केले. त्यांनी गणपती मंदिरातील पूजेच्या मानपानावरून वाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला.
भाग्यश्री यांना पोलिस बंदोबस्त
श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या कन्या तथा अभिनेत्री भाग्यश्री यांनी मंदिरात पूजा व आरती केल्यानंतर वाद चव्हाट्यावर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना पोलिस बंदोबस्त दिला आहे.
भाग्यश्री म्हणतात...
पूजा आणि आरती झाल्यानंतर माध्यमांजवळ अभिनेत्री भाग्यश्री म्हणाल्या, उत्सवासाठी चार वर्षांत मी आले नव्हते. पूर्वी उत्सवात सहभागी व्हायचे. यंदा मी उत्सवात सहभागी होण्यासाठी आली आहे.
दररोज सांस्कृतिक कार्यक्रम
गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वानिमित्त गणपती पंचायतन संस्थानच्या उत्सवमूर्तीची मोठ्या उत्साहात राजवाड्यातील दरबार हॉल येथे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत घोडे, टाळ-मृदुंग आणि बँडच्या गजरात पालखीतून उत्सवमूर्ती दरबार हॉलमध्ये आणण्यात आली. तेथे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, राणीसाहेब राजलक्ष्मीराजे पटवर्धन आणि युवराज आदित्यराजे यांनी उत्सवमूर्तीचे स्वागत करून विधिवत प्राणप्रतिष्ठापना व आरती केली. संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी सांगितले की, आजपासून पाच दिवस दरबार हॉल येथे दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.
अभिनेत्री भाग्यश्री यांचा हॉटेलमध्ये मुक्काम
श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या कन्या तथा अभिनेत्री भाग्यश्री या संस्थानच्या उत्सवात पूर्वी बहुतेक वेळा सहभागी होत असत. सांगलीकरांना त्यांचे मोठे अप्रूप असायचे. मात्र, चार वर्षांत त्या उत्सवासाठी आल्या नव्हत्या. रविवारी रात्री त्या त्यांच्या मुलीसह सांगलीत आल्या. मात्र, त्या श्रीमंत विजयसिंहराजे यांच्या बंगल्यावर गेल्या नाहीत. त्यांनी सांगलीतील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला आहे.