सांगली

Sangli Accident : विहिरीत कार कोसळून तरुणाचा मृत्यू

चिकुर्डे-करंजवडे मार्गावरील घटना, दोन दिवसांनंतर मृतदेह बाहेर काढला

पुढारी वृत्तसेवा

कुरळप : वाळवा तालुक्यातील चिकुर्डे-करंजवडे मार्गावरील विहिरीत मोटार कोसळून ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील धनंजय सुभाष शेटे (वय ४१) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री कामावरून घरी निघालेले धनंजय घरी परतलेच नाहीत. शोधमोहिमेदरम्यान विहिरीजवळ मोटारीचे तुटलेले भाग आढळून आले. यामुळे शोधमोहिमेला दिशा मिळाली. अखेर दोन दिवसांनंतर गुरुवारी सकाळी क्रेन आणि विशेष यंत्रणेच्या मदतीने विहिरीतून मोटारीसह मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय शेटे हे वारणानगर येथील वारणा संकुलात कार्यरत होते. मंगळवारी रात्री काम संपवून ते मोटारीतून घरी परतत होते. चिकुर्डे-करंजवडे मार्गावरील रस्त्यालगतच्या विहिरीत त्यांची मोटार कोसळली. उशिरापर्यंत ते घरी न पोहोचल्याने आणि संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. बुधवारी विहिरीजवळ मोटारीच्या आरशाचे व इंडिकेटरचे तुकडे आढळल्याने मोटार विहिरीत पडल्याचा संशय बळावला.

बुधवारी रात्री शोधमोहीम अपूर्ण राहिल्यानंतर, गुरुवारी सकाळी सहा वाजता कराड येथून क्रेन आणि पाणी उपसण्याची यंत्रणा मागवण्यात आली. विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली असल्याने अडचणी येत होत्या. त्यानंतर कोल्हापूर येथील आपत्कालीन जीवरक्षक दिनकर कांबळे यांनी विहिरीत उतरून मोटारीचा शोध घेतला. क्रेन आणि दोरखंडाच्या साहाय्याने अथक प्रयत्नांनंतर मोटार विहिरीतून बाहेर काढण्यात आली.

जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, जयराज पाटील, भाजप उपाध्यक्ष अशोक पाटील, चिकुर्डेचे सरपंच रणजित पाटील, ऐतवडे बुद्रुकचे सरपंच सुभाष कुंभार, सहायक निरीक्षक भरत पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हसऱ्या आणि मनमिळाऊ स्वभावाच्या धनंजय यांच्या अकाली निधनाने शेटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ऐतवडे बुद्रुक परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT