तासगाव : बलगवडे फाटा (ता. तासगाव) येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या दुचाकीच्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले. विजया अंकुश शिंदे (रा. जरंडी, ता. तासगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी माणिक नामदेव लोंढे (वय ५५, रा. बस्तवडे) यांनी फिर्याद दिली.
माणिक लोंढे हे शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बलगवडे फाटा येथे जळण गोळा करण्यासाठी गेले होते. जळण गोळा केल्यानंतर रस्त्याकडेला लावलेल्या त्यांच्या दुचाकीवर (एमएच १० एव्ही २४९३) जळण बांधत असताना मागून आलेल्या संजय दिलीप पाटील यांच्या दुचाकीने (एमएच १० डीएन ९६९१) लोंढे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवर पाटील यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या आत्या विजया शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात माणिक लोंढे व संजय पाटील हे दोघेही गंभीर जखमी झाले.