आष्टा : आष्टा-वडगाव रस्त्यावरील फाळकेवाडी चांदोली वसाहतीनजीक शनिवारी (दि. 14) पहाटे दुचाकी रस्त्याकडेच्या झाडाला धडकून भीषण अपघात झाला. या घटनेत दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. प्रसाद सुनील बामणे (वय 19, रा. बागणी, ता. वाळवा), संदेश मिथुन भंडारे (21, सध्या रा. बागणी, मूळ रा. मालगाव, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत. डोक्याला गंभीर दुखापत आणि अतिक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, प्रसाद आणि संदेश हे दोघेजण शनिवारी पहाटे आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच 10 ईजी 4809) बागणीकडून आष्ट्याकडे येत होते. फाळकेवाडी येथील लक्ष्मी मंदिराजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट रस्त्याकडेच्या झाडाला जाऊन धडकली. हा अपघात पहाटेच्या वेळी निर्जनस्थळी घडल्याने दोन्ही तरुणांना वेळेवर मदत मिळू शकली नाही. सकाळी या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी तत्काळ आष्टा पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दोघांनाही खासगी रुग्णवाहिकेतून आष्टा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. घोंगडे यांनी त्यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेची माहिती आष्टा ग्रामीण रुग्णालयामार्फत पोलिसांना देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. अधिक तपास सुरु आहे.