सांगली : सांगली-आष्टा मार्गावरील सांगलीवाडी परिसरातील संभाजीनगर चौकात भरधाव दुचाकीने पाठीमागून दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मैनुद्दीन हनिफसो जमादार (वय ५२, रा. केरबा पवार प्लॉट, सांगलीवाडी, ता. मिरज) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दुचाकीचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास मैनुद्दीन जमादार हे सांगली-आष्टा मुख्य रस्त्यावरून संभाजीनगर चौक (सांगलीवाडी) येथे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत जात होते. त्याचवेळी नीलेश निवृत्ती पाटील (रा. कवठेपिरान, ता. मिरज) हा आष्टा बाजूकडून सांगलीकडे दुचाकीवरून (क्र. एमएच १० इजी ३२६७) येत होता.
भरधाव वेगात असलेल्या नीलेशच्या दुचाकीची रफिक यांना पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात जमादार यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत जमादार यांचा मुलगा रफिक याने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.