नागज : कवठेमहांकाळ तालुक्यातील रायवाडी-वाघोली रस्त्यावर मालवाहतूक वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात बाळासाहेब महादेव शिंदे (वय 50, रा. नागज, ता. कवठेमहांकाळ) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार, दि. 16 रोजी सकाळी सातच्या सुमारास रायवाडी गावच्या हद्दीत घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब शिंदे हे त्यांच्या दोन साथीदारांसह मालवाहू टेम्पोमधून (क्र. एम.एच. 10 ए.क्यू. 9868) बैलगाडी शर्यतीसाठी लोकरेवाडीला निघाले होते. रायवाडी ते वाघोली रस्त्यावरील तीव्र चढ चढत असताना अचानक गाडीचा गिअर न पडल्याने गाडी उतारावर मागे येऊ लागली. नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून सुमारे पंधरा फूट खोल खड्ड्यात उलटली. गाडी थेट बाळासाहेब शिंदे यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नागज आणि रायवाडी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बाळासाहेब शिंदे यांच्या अपघाती निधनामुळे नागज गावावर शोककळा पसरली होती. अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे.
...तर जीव वाचला असता
अपघाताच्या ठिकाणी असलेल्या तुटलेल्या संरक्षक कठड्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. अपघातग्रस्त गाडी रस्त्याकडेच्या याच कठड्याच्या जवळून खाली कोसळली. हा संरक्षक कठडा सुस्थितीत असता, तर निश्चितच बाळासाहेब शिंदे यांचा जीव वाचला असता, अशी चर्चा घटनास्थळी उपस्थित लोक करत होते.