मृत संभाजी कदम, राजेश कदम Pudhari
सांगली

Sangli Accident : नवरात्रीची ज्योत आणताना काळाचा घाला; कौठुळीचे दोन युवक ठार!

तुळजापूर-धाराशिव मार्गावर दुचाकी घसरली; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : नवरात्रोत्सवासाठी आई भवानीची ज्योत आणण्याच्या भक्तिमय प्रवासाला निघालेल्या कौठुळी येथील दोन युवकांवर काळाने घाला घातला. तुळजापूर येथून देवीची ज्योत घेऊन परतत असताना तुळजापूर-धाराशिव मार्गावर झालेल्या भीषण अपघातात संभाजी प्रल्हाद कदम (वय ४०) आणि राजेश आप्पासाहेब कदम (वय ३८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवरात्रोत्सवाच्या उत्साहात असलेल्या कौठुळी गावावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

आटपाडी तालुक्यातील कौठुळी येथील भवानी नवरात्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त देवीची ज्योत आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी शनिवारी गावातील सुमारे २५ ते ३० युवक पिकअप व्हॅन आणि तीन ते चार मोटारसायकली घेऊन भक्तिभावाने तुळजापूरला गेले होते. देवीची ज्योत आणण्याचा उत्साह, नवरात्रोत्सवाची लगबग आणि गावात परतल्यानंतर होणाऱ्या स्वागताची ओढ अशा वातावरणात त्यांचा प्रवास सुरू होता. मात्र, या आनंदमय प्रवासावर काळाने घाला घातला.

तुळजापूर येथून देवीची ज्योत घेऊन परतत असताना मध्यरात्रीच्या सुमारास तुळजापूर-धाराशिव मार्गावर संभाजी कदम आणि राजेश कदम प्रवास करत असलेली दुचाकी घसरली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

संभाजी कदम हे पानशॉपचा व्यवसाय करत होते, तर राजेश कदम हे गलाई व्यवसायात कार्यरत होते. देवीची ज्योत घेऊन सुखरूप गावात परतण्याची आस मनात बाळगून निघालेल्या या दोघांचा प्रवास नियतीच्या क्रूर आघाताने संपला. ज्या नवरात्रोत्सवासाठी ते श्रद्धेने घराबाहेर पडले होते, त्याच उत्सवाच्या प्रारंभी त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा असह्य आघात झाला. या घटनेने गावातील प्रत्येकाच्या मनाला चटका लावला आहे.

संभाजी कदम आणि राजेश कदम यांच्या निधनाची बातमी कौठुळीत पोहोचताच गावात शोककळा पसरली. दोन्ही कुटुंबांतील सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातून देवीची ज्योत आणण्यासाठी आनंदाने बाहेर पडलेल्या आपल्या मुलांच्या परतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कुटुंबीयांवर त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकण्याची वेळ आली. या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामस्थही सुन्न झाले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नवरात्रोत्सवाच्या मंगलमय वातावरणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे गावातील आनंदावर विरजण पडले आहे. उत्सवाच्या तयारीत असलेल्या गावाला या घटनेने मोठा धक्का बसला. दोन्ही युवकांच्या अकाली निधनाने त्यांच्या मित्रपरिवारासह ग्रामस्थांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, रविवारी सायंकाळी संभाजी कदम आणि राजेश कदम यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने जड अंतःकरणाने त्यांना अखेरचा निरोप दिला. देवीची ज्योत आणण्यासाठी श्रद्धेने निघालेल्या दोन युवकांच्या आयुष्याची ज्योत मात्र वाटेतच मालवली. नवरात्रोत्सवाच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कौठुळी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दोघांच्या आठवणी ग्रामस्थांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT