दुचाकीची झाडाला धडक; जाखापूरचा तरुण ठार 
सांगली

Sangli Accident : दुचाकीची झाडाला धडक; जाखापूरचा तरुण ठार

कवठे-महांकाळ-जत रस्त्याजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : कवठे-महांकाळ-जत रस्त्यावर शहरापासून काही अंतरावर असलेल्या पाण्याची ओघळ परिसरात रस्त्यालगत पडलेल्या वडाच्या झाडाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात अक्षयकुमार हणमंत माळी (वय 29, रा. जाखापूर ता. कवठेमहांकाळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास ही घटना घडली.

स्थानिक नागरिक व जाखापूर येथील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयकुमार दुचाकीवरून (क्र. एमएच 10 डीयू 7331) कवठेमहांकाळ शहराकडे येत होता. पाण्याची ओघळ या ठिकाणी रस्त्यालगत पडलेल्या वडाच्या झाडाला त्याची दुचाकी जाऊन धडकली. धडक इतकी जोरात होती की, अक्षयकुमार गंभीर जखमी झाला. वर्मी मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अक्षयला कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. या अपघाताची माहिती अपघातस्थळावरून स्थानिक नागरिकांनी व उपजिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कवठेमहांकाळ पोलिसांना दिली. अक्षयकुमारच्या आकस्मिक मृत्यूची माहिती समजताच जाखापूर गावावर शोककळा पसरली. होतकरू तरुणाच्या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. शोकाकूल वातावरणात बुधवारी रात्री जाखापूर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, बुधवारी रात्री उशीरापर्यंत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT