ईश्वरपूर : तुजारपूर फाटा (ता. वाळवा) येथे भरधाव मोटारीने धडक दिल्याने शंकर बंडू चव्हाण (वय ७०, रा. उरूणवाडी, ता. वाळवा) या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी घडला. याप्रकरणी मोटारचालक रवींद्र विद्याधर मिठारे (वय ५४, रा. आरग, ता. मिरज) याच्याविरोधात ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत शंकर यांचे पुतणे गणेश चव्हाण यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शंकर चव्हाण हे उरूणवाडीकडून चालत तुजारपूर फाट्याकडे निघाले होते. यावेळी पेठच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मोटारीने (क्र. एमएच १० ईव्ही ९९६१) त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद ईश्वरपूर पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.