कोकरूड : वाकुर्डे बुद्रुक-शेडगेवाडी या मार्गावर येळापूरपैकी आटुगडेवाडी (ता. शिराळा) येथे ट्रॅक्टरवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालक श्रीपद शिवाजी ठाकरे (वय 40, रा. विटनेर, ता. जळगाव, सध्या रा. वाटेगाव, ता. वाळवा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. घटनेची नोंद कोकरूड पोलिसात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डालमिया शुगर कारखान्यासाठी जळगाव येथील ऊसतोड मजुरांची टोळी वाटेगाव (ता. वाळवा) येथे ऊस तोडणीचे काम करीत होती. हा ऊस डालमिया शुगर कारखान्याकडे चालला होता. वाटेगावहून, बांबवडे, टाकवे, शिवरवाडी, शिरशी, आंबेवाडी फाटामार्गे वाकुर्डे बुद्रुक घाटातून पुढे आल्यानंतर आटुगडेवाडी हद्दीत चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. त्यामुळे ऊस भरलेला ट्रॅक्टर (एमएच 23 डीएम 3997) वेगाने रस्त्याकडेच्या घराच्या स्वच्छतागृहाला धडकला. उसाने भरलेल्या ट्रॉल्याही जागीच उलटल्या. पुढे कठड्याला आदळून ट्रॅक्टर थांबला.
या अपघातात ट्रॅक्टरखाली सापडल्याने चालक श्रीपद ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची फिर्याद कृष्णा धनराज भील (रा. विटनेर, ता. जळगाव) यांनी कोकरूड पोलिसात दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.