ऐतवडे खुर्द : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा नदीच्या पुलावर सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. वारणानगरच्या दिशेने चाललेली कार (क्र. एमएच ०९ एएन ९४९५) पुलाचे लोखंडी कठडे तोडून थेट १५ फूट खाली कोसळली. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला असला, तरी वेळेत एअरबॅग उघडल्यामुळे चालक सुखरूप बचावला आहे.
निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील सरला हंबीरराव मोहिते यांच्या मालकीची कार घेऊन चालक पृथ्वीराज चौगुले ऐतवडे खुर्द येथून वारणानगरकडे जात होते. वारणा नदीच्या पुलावर आल्यानंतर कारची पुलाच्या लोखंडी कठड्याला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की लोखंडी कठडा तोडून कार १५ फूट खाली जाऊन पडली.
सकाळच्या वेळी झालेल्या या अपघाताच्या प्रचंड आवाजाने परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे चालक पृथ्वीराज चौगुले यांना कारमधून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून चालक चौगुले हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा अधिक तपास कुरळप पोलिस करत आहेत.