कडेगाव शहर : आंबेगाव (ता. कडेगाव) येथे कराड - विटादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर स्कूल बसला मोटारीने समोरून जोरदार धडक दिली. अपघातात मोटारचालक अजित तुकाराम माने (वय 45, रा. बार्शी, जि. सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत. सुदैवाने बसमधील विद्यार्थी बचावले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवार, दि. 31 रोजी सायंकाळी 6 वाजता घडली.
याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी सायंकाळी विद्यार्थ्यांची बस विटा येथून कडेगावकडे निघाली होती, तर बार्शी येथील अजित माने हे पत्नी वर्षा (वय 40) व मुलगी अपूर्वा (13) यांच्यासह मोटारीतून (एमएच 13 बीएन 4847) कडेगावहून विट्याकडे निघाले होते. आंबेगाव येथे अजित माने यांचा मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटार विरुध्द बाजूला जाऊन समोरून येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला धडकली. अपघात एवढा भीषण होता की, मोटारीची पुढील बाजू बसच्या पुढील बाजूने आतमध्ये शिरली. यात मोटार चालक अजित माने हे गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी वर्षा आणि मुलगी अपूर्वा दोघी गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात बसमधील काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. अपघाताची रात्री उशिरा कडेगाव पोलिसात नोंद झाली. अधिक तपास सहायक निरीक्षक गणेश कोकाटे करीत आहेत.