निंबळक : चिखलगोठण (ता. तासगाव) येथील आंधळी रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रशांत राजेंद्र साळुंखे (वय २६) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दि. १७ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत साळुंखे हे त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच १० डीई ७७४०) आंधळी-चिखलगोठण मार्गाने जात होते. त्यावेळी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरशी त्यांची धडक झाली. या धडकेत ते उसाच्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडले आणि त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, नागरिकांनी पाठलाग करून आंधळी येथील चौकात ट्रॅक्टर अडवला आणि चालकास पकडून ठेवले.
घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.