ईश्वरपूर ःपेठ-शिराळा रस्त्यावरील रेठरेधरण (ता. वाळवा) तलावाजवळ उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला.
पवन सुरेश कदम (वय 23, रा. कदमवाडी, ता. शिराळा) आणि अभिषेक अमर परदेशी (वय 24, रा. शिराळा) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक बाबासाहेब पाटील यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि पवन हे दोघे बुधवारी रात्री कामानिमित्त ईश्वरपूर येथे गेले होते. काम आटोपून ते दुचाकीवरून (एमएच 10 ईएस 1537) गावाकडे परतत असताना रेठरेधरण तलावाजवळ हा अपघात झाला. शिराळ्याच्या दिशेने ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला (एमएच 09 सीजे 9430) त्यांच्या दुचाकीने पाठीमागून भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, दोघेही रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्राव झाला. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अभिषेक परदेशी हा एका फायनान्स कंपनीत कार्यरत होता, तर पवन कदम नोकरीच्या शोधात होता. अभिषेक हा घरचा एकुलता एक मुलगा होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले असून आई खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते. पवनच्या पश्चात आई-वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. दोन तरुण मित्रांच्या अकाली निधनाने शिराळा आणि कदमवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.