कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील विहापुर येथे घर व शेतजमीन नावावर करीत नसल्याच्या कारणावरून धरून पोटच्या पोराने बापाचा खून केल्याची घटना घडली. डोक्यात लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन हा खून केल्याची माहिती आहे. तानाजी यशवंत माने (वय ७०, रा. विहापूर) असे मयताचे नाव आहे. तर याप्रकरणी संशयित आरोपी प्रदीप तानाजी माने याच्या विरोधात कडेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मयत तानाजी माने यांच्या पत्नी मंगल तानाजी माने ( वय 50 )यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान या घटनेने विहापुर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तानाजी माने हे विहापुर येथील रहिवाशी असून ते शेती करीत होते. त्यांचा मुलगा संशयित आरोपी प्रदीप माने याला दारूचे व्यसन आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो घर आणि जमीन नावावर करा म्हणून आपल्या वडीलाशी वाद घालत होता. दरम्यान शनिवार (दि २९) रोजी दुपारी संशयीत प्रदीप हा दारू पिऊन आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर वडील तानाजी माने यांच्यासोबत घर आणि शेतजमीन नावावर करण्याच्या कारणावरून वाद घालू लागला. त्यानंतर त्याने रागाच्या भरात व दारूच्या नशेत वडील तानाजी यांना लाकडी दांडक्याने डोक्यात, खांद्यावर जबर मारहाण केली.याचबरोबर तानाजी यांचे तोंड व डोके फरशीवर आपटले. यामध्ये तानाजी हे गंभीर जखमी झाले. सांगली सिव्हील हॉस्पिटल मध्ये तानाजी यांना उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा रविवार (दि 30) रोजी मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास कडेगांव पोलीस निरीक्षक शहाणे करीत आहेत.