file photo 
सांगली

सांगली : हिंगणगाव खुर्द येथे कारच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार

backup backup

कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील हिंगणगाव खुर्द (ता. कडेगाव) येथे भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. संदेश आत्माराम दंडवते (रा. हिंगणगाव खुर्द, वय 48) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. २३) सकाळी साडेसहा वाजता घडली. याबाबत अशोक राजाराम दंडवते यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली. कडेगाव पोलिसांनी कार चालक राहुल तात्यासो थोरात (रा.सोनसळ, ता.कडेगाव) याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हिंगणगाव खुर्द येथील संदेश दंडवते हे नेहमी मित्रांसोबत मधल्या डोंगराई रस्त्याला मॉर्निंग वॉकला जात होते. ते गावातून आपल्या मोटार सायकलवरुन जायचे. ही मोटारसायकल डोंगराई रस्त्याच्या पायथ्याला लावून तेथून मित्रमंडळीसोबत डोंगरावर मॉर्निंग वॉकला जात होते.

नेहमीप्रमाणे ते आज (दि. २३) पहाटे साडे सहाच्यापूर्वी घरातून आपल्या मोटारसायकलवरुन (एम.एच. 10 सी.पी. 3666) निघाले होते. यावेळी ते तडसर-कडेपूर व हिंगणगाव खुर्द-डोंगराई डोंगर या दोन्ही रस्त्यावरील चौकात पोहोचले. दरम्यान  तडसरहून कडेपूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या कारने (एम.एच 11 एच 3054) त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वार संदेश दंडवते यांच्या डोक्याला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिलेल्या कारमध्ये (एम.एच.11.एच.3054) अवैध दारुचे बॉक्स आढळून आले.

अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेतली. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील संदेश दंडवते यांना वाहनातून उपचारासाठी कऱ्हाड येथे कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची कडेगाव पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास कडेगाव पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT