सांगली : ‘नवीन सेवा जोडणी’ योजनेंतर्गत जिल्ह्यात 22.29 कोटी रुपयांची कामे झाली. यात 28.48 किलोमीटर लांबीच्या उच्चदाब वाहिन्या आणि 93.23 किलोमीटर लांबीच्या लघुदाब वाहिन्या टाकण्यात आल्या. तसेच 143 वितरण रोहित्रे उभारण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील 8,291 ग्राहकांना निर्धारित वेळेत वीज जोडणी मिळाली आहे.
महावितरणच्या ‘नवीन सेवा जोडणी’ (एनएससी) योजनेमुळे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर (कृषी वगळून) ग्राहकांना नवीन वीज जोडणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी आता विनाशुल्क मिळत आहे. या योजनेअंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये गेल्या सहा महिन्यांत 47.85 कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली. त्यामुळे 17,768 नवीन ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
ग्राहकांना महावितरणच्या विविध सेवा घरबसल्या ऑनलाईन उपलब्ध असून, नवीन वीज जोडणीसाठी अर्ज, सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव ऑनलाईन पद्धतीने भरता येते. महावितरणकडून अर्जदारास परिपूर्ण अर्ज व आवश्यक शुल्क भरल्यानंतर वीज पुरवठा करण्यात येतो. विद्यमान वाहिन्यांचा विस्तार, नवीन वाहिन्यांची उभारणी अथवा यंत्रणेची क्षमता वाढविणे, अशा पायाभूत सुविधा आवश्यकतेनुसार ‘नवीन सेवा जोडणी’ (एनएससी) योजनेतून महावितरणकडून उभारल्या जात आहेत. कोणताही अकृषक ग्राहक वीज सेवेपासून वंचित राहू नये, यासाठी अकृषक ग्राहकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा महावितरणच्या खर्चाने ‘नवीन सेवा जोडणी’ (एनएससी) योजनेतून उभारल्या जातात.
महावितरणकडून औद्योगिक ग्राहकांसाठी स्वतंत्र ‘स्वागत कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षामार्फत औद्योगिक ग्राहकांना वीज जोडणी, लोड वाढ, वीज तांत्रिक माहिती यासाठी मार्गदर्शन आणि तत्पर सेवा देण्यात येते. उद्योगांसाठी जलदगतीने आणि सोप्या प्रक्रियेतून वीज जोडणी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.