नंदू गुरव
सांगली: कल्पकता, नवनिर्मिती क्षमता, सर्जनशीलता वयावर, तुम्ही एखाद्या क्षेत्रात किती वर्ष खर्च केलात, यावर अवलंबून नसतेच. कलावंतांना हे भान, समज लवकर येते. नव्या पिढीचे चित्रकार, शिल्पकार आपला भवताल अनुभवत आहेत. ज्या विसंगती त्यांना जाणवतात, त्या कागदावरती आणायचा प्रयत्न करत आहेत. निसर्ग, कुटुंबव्यवस्था, बदललेली जीवनशैली, समाजकारण आणि राजकारणाचे अनेक गडद रंग यामुळेच त्यांच्या चित्रात, शिल्पात उतरले आहेत. नव्या कलावंतांच्या नजरेतून साकारलेल्या या विविध भूमिका आणि विचारांचे सखोल दर्शनच राज्य कला प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे.
65 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आज-सोमवार दि. 16 पासून शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात सुरू होत असून या प्रदर्शनामध्ये राज्यभरातील पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्र आणि शिल्पकृती मांडण्यात आल्या आहेत. प्रदर्शनासाठी राज्यभरातून 1 हजार 275 कलाकृतींची निवड झाली आहे. या कलाकृतीतून नव्या कलावंतांच्या नव्या विचारांची, नव्या भूमिकेची ओळख होणार आहे. नव्या जगाचे प्रतिबिंब दिसणार आहे. हे सारेच कलावंत आधुनिक काळ अनुभवणारे आहेत. जरी ते विद्यार्थी असले तरी आणि ते सारे वीस, पंचविशीच्या वयाचे असले तरी, या नव्या परिवर्तनाकडे ते कसे बघतात, ते बघण्यासाठी सर्वांनी हे प्रदर्शन पाहिले पाहिजे, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आलं आहे.
साऱ्याच क्षेत्रांना एआय अर्थात कृत्रिम बुध्दिमत्तेची भिती वाटत असली तरी अत्याधुनिक जमान्यातही तुमची सृजनशीलता कोणी हिरावून घेऊ शकत नाही, याचा भक्कम पुरावा म्हणजे हे कला प्रदर्शन. कितीही आधुनिक तंत्र आले तरी स्क्रीनवरचा स्पर्श तुम्हाला सृजनशिलतेचा अनुभव देऊच शकत नाही. मोबाईलच्या स्क्रिनला एखादे सुंदर मॉडेल काय आणि एकादा अपघात काय? पण कलाकृतीचे तसे नाही. चित्र आणि शिल्पांचा स्पर्श एक वेगळी अनुभूती देतो. त्याचा अनुभव या प्रदर्शनातून येणार आहे.
प्रत्येक कलाकृतीचे माध्यम वेगळे आहे. सर्वसामान्य माणसाला चित्राची भाषा समजायला थोडी अवघड जाते, पण जशी संगीताची एक भाषा आहे, नाटकाची एक भाषा आहे, तशी चित्रांची पण एक भाषा असते. ती अवगत करायची असेल, जाणून घ्यायची असेल, तर ती समजून घ्यावी लागेल, हे शिकवणारे हे प्रदर्शन आहे. प्रत्येकाची अभिरुची वगैरे त्याच्यावर झालेल्या संस्काराने तयार होते. त्यामुळे प्रत्येक चित्राची अनुभूतीही प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव देते, रसिकांनी यावे, पाहावे, आवडले तर आवडले म्हणावे, नाहीतर सोडून द्यावे, इतके साधे-सोपे हे प्रदर्शन आहे. जे आजपासून 22 फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.