Sangli Municipal Corporation Pudhari
सांगली

Sangli News| नशेखोरी वाढली, खुनांची मालिका; 'ब्लॅक स्पॉट'वर उजेड पाडा

उपाययोजनांबाबत महासभेत नगरसेवकांची संतप्त मागणी; तातडीने दिवे बसविण्याचे महापौर, आयुक्तांचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शहरात नशेखोरी प्रचंड वाढली आहे. वर्षभरात ६३ खून झाले आहेत. अंधाऱ्या ठिकाणी नशेखोरांचे अड्डे वाढले आहेत. या 'ब्लॅक स्पॉट'वर उजेड पाडण्याबाबत अनेकदा लक्ष वेधूनही प्रशासन कार्यवाही करत नाही. दिवे बसवले जात नाहीत, बंद दिवे बदललेले नाहीत, असा संताप महासभेत व्यक्त झाला. ब्लॅक स्पॉट, डार्क स्पाॅटवर तरी तातडीने दिवे लावून उजेड पाडा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. दरम्यान, प्रभारी महापौर गजानन मगदूम व आयुक्त संजीता महापात्र यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

सम्राट अशोक चौक ते यशवंतनगर मराठा चौक या रस्त्यावर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ३५ लाख रुपये खर्चून पथदिवे बसवण्याचा विषय महासभेत चर्चेला आला. याला मान्यता देण्यात आली. यावेळी बंद पथदिवे व विस्तारित भागात नवीन दिवे बसवण्याच्या विषयावरून नगरसेवक आक्रमक झाले. जगन्नाथ ठोकळे म्हणाले, समुद्र कंपनीने काम थांबवल्याने त्या ठिकाणी दिवे बसवण्यासाठी नवीन कंपनी नियुक्त केली. मात्र ही कंपनीही संथगतीने काम करत आहे. पथदिवे बंद आहेत. कृष्णा नदी ते बायपास रस्ता अंधारात आहे. माधवनगर रोड उड्डाण पूलही अंधारात आहे. माझ्या प्रभागातील सहा ते सात खून झाले. त्या ठिकाणी स्ट्रिट लाईट नाहीत. शहरात नशेखोरी, गुन्हेगारी वाढली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर वर्षभरात तब्बल ६३ खून झाल्याची पुश्ती एका नगरसेवकाने जोडली. अंधार असणाऱ्या ठिकाणी नशेखोरांचे अड्डे बनत आहेत. गेल्या काही दिवसांपासून यावर उपाय करण्यासाठी पदाधिकारी, नगरसेवक व पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्याची मागणी करत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ठोकळे यांनी केला.

नगरसेविका सोनल पाटील यांनीही डार्क स्पॉटवर दिवे, सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली. युवराज बावडेकर म्हणाले, पथदिव्यांसाठी नेमलेल्या दुसऱ्या कंपनीचे कामही समुद्र कंपनीसारखेच आहे का?, अशोक मासाळे यांनी, पट्टणशेट्टी शोरूम ते फल्ले मंगल कार्यालय या रस्त्यावर दिवे लावण्याची मागणी केली. युवराज गायकवाड यांनी, आलदर चौक ते स्फूर्ती चौक या रस्त्यावरील ३६ पैकी केवळ ६ पथदिवे सुरू असल्याचे सांगितले.

आयुक्त संजीता महापात्र म्हणाल्या, समुद्र कंपनीसोबतचा विषय सुटलेला नाही. त्यांच्याकडील बंद दिवे बसवण्याचे काम दुसऱ्या कंपनीकडून करून घेतले जात आहे. बंद दिवे बसवणे, नवीन पोल उभारून दिवे बसवणे यासाठी मनुष्यबळ वाढवण्याचे निर्देश संबंधित कंपनीला दिले आहेत.

२० गुंठे जागेवरील कंपाउंड पाडणार

पाटबंधारे कार्यालय ते बालाजीनगर रस्त्यावर महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. महापालिकेची ८ कोटी रुपयांची २० गुंठे जागा लाटण्याचा प्रयत्न काहींकडून होत आहे. त्याबाबत तक्रार करूनही नगररचना विभागाकडून कार्यवाही झाली नसल्याकडे विष्णू माने यांनी लक्ष वेधले. त्यावरून उपायुक्त अश्विनी पाटील म्हणाल्या, प्रत्यक्षस्थळी भेट दिली आहे. कागदपत्रे तपासली आहेत. अतिक्रमण केलेले कंपाउंड पाडणार आहोत. नगरसेवक संतोष पाटील यांनी मिरजेतील गणी मळ्यातील अतिक्रमणाचा मुद्दा मांडला. कब्जेपट्टी मिळाल्यानंतरही महापालिका संबंधित जागेवर नाव लावून का घेत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर कार्यवाही केली जाईल, असे आयुक्त संजीता महापात्र यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT