सांगली : महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 568 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यापैकी 540 केंद्रांवर मतदान होईल. उर्वरित केंद्रे राखीव असणार आहेत. मिरजेतील शासकीय गोदामात स्ट्राँग रूम व मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी शुक्रवारी सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. आयुक्त सत्यम गांधी हे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीनंतर आता महापालिकांच्या निवडणुकीचा आखाडा सुरू होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश सर्व महापालिका आयुक्तांना दिलेले आहेत. मतदार यादी अचूक करण्याबाबत निर्देश दिले आहेत. अंतिम मतदार यादी दि. 15 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी दि. 20 डिसेंबर रोजी, तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी दि. 27 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्याची लगबग महापालिका स्तरावर जोरात सुरू आहे. अंतिम मतदार यादीकडे इच्छुक उमेदवार व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाकडून युध्दपातळीवर तयारी सुरू आहे. आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त आश्विनी पाटील, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह सहायक आयुक्त, विभाग प्रमुखांच्या बैठका सुरू आहेत. महापालिका निवडणुकीसाठी सांगली, मिरज व कुपवाड शहरात प्रशासनाने 568 मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. या मतदान केंद्रांची पाहणी करून तेथील सुविधांचा आढावा घेतला जात आहे.
याशिवाय मतदान यंत्रे ठेवण्यासाठी मिरजेतील शासकीय गोदामात स्ट्राँग रूम करण्यात येणार आहे. येथील गोदामातच मतमोजणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मतमोजणीसाठी शासकीय गोदामासह सांगलीतील तरुण भारत व्यायाम मंडळ व अन्य चार-पाच ठिकाणांची प्रशासनाने पाहणी केली होती. मात्र सुरक्षा, गर्दी, वाहतूक आदींचा विचार करून मतमोजणीसाठी शासकीय गोदाम हे ठिकाण निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 1 हजार 250 ईव्हीएम यंत्रांची मागणी करण्यात आली आहे. यात बॅलेट युनिट जास्त असणार आहेत. 568 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यातील 540 मतदान केंद्रांवरच मतदान होणार असून उर्वरित राखीव असणार आहेत. एका मतदान केंद्रावर 800 ते 900 मतदान असणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त सत्यम गांधी असणार आहेत. सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात येणार आहे. यातील एक अधिकारी राखीव असणार आहे, तर सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे 20 प्रभागांची विभागून जबाबदारी दिली जाणार आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने दि. 19 रोजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण केले आहे. या दिवशी आयोगाकडून महापालिकांना निवडणुकीसाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप होणार आहे. यात मतदान यंत्रांचे सील व अन्य अत्यावश्यक साहित्याचा समावेश असणार आहे.