कुपवाड : जुना कानडवाडी ते कुपवाड रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलसमोरील रस्त्यावर गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा संशयितांना कुपवाड पोलिसांनी अटक केली. त्याच्या पिशवीत असलेला 2 किलो 125 ग्रॅम वजनाचा अंदाजे 53 हजार 125 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. धोपल ऊर्फ डोक्या महिमान्या काळे (वय 25, रा. पाण्याच्या टाकीजवळ, सावळी, ता. मिरज), कान्या शिवाजी पवार (वय 45, रा. मायाक्का मंदिराजवळ, कवलापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
कुपवाड पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी मंगळवार, दि. 28 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कुपवाड एमआयडीसी परिसरात गस्तीवर होते.
यादरम्यान, हवालदार प्रवीण मोहिते यांना बातमीदारामार्फत दोन संशयित तरुण जुना कानडवाडी ते कुपवाड रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलसमोर संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी पाहिले असता दोन तरुण हातात दोन पिशव्या घेऊन थांबलेले आढळून आले.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कुपवाड पोलिस ठाण्यात आणले. चौकशी केली असता गांजा विक्री करण्यासाठी कुपवाड एमआयडीसी परिसरात आलो होतो, अशी कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी दोघांच्या पिशवीची तपासणी केली असता संशयित धोपल ऊर्फ डोक्या काळे याच्याजवळील प्लास्टिक पिशवीमध्ये एक किलो 380 ग्रॅम वजनाचा अंदाजे 34 हजार 500 रुपयांचा काळपट हिरवट रंगाचा गांजासदृश वनस्पतीचा फुलपाला, बोंडे असलेला गांजा, तसेच दुसरा संशयित कान्या पवार याच्या हातात असलेल्या पिशवीत 745 ग्रॅम वजनाचा अंदाजे 18 हजार 625 रुपये असा एकूण 53 हजार 125 रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला. दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.