सांगली : मोहन यादव : मागील दोन वर्षांत राज्यातील ऊस वाहतूकदारांची सुमारे 500 कोटी रुपयांची फसवणूक तोडणी मजूर व मुकादमांकडून झाली आहे. साखर कारखानदार व सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे वाहतूकदारांची शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. याबाबत आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेत संघटना स्थापन करून आरपारची लढाई सुरू केली आहे. पंधरा वर्षापूर्वी तोडणी -वाहतुकीचे नियोजन साखर कारखाने करीत होते. पण फसवणुकीचे प्रकार वाढत चालल्याने कारखानदारांनी यातून अंग काढून घेतले. मात्र पोटा-पाण्याचा प्रश्न असल्याने वाहतूकदारांना स्वत:ची रक्कम गुंतवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
ऊस तोडणी व वाहतूक करण्यासाठी एका वाहनांमागे किमान दहा मजुरांची गरज लागते. दररोज 25 टन ऊस तोडायचा असेल तर प्रत्येक वाहनांसाठी 12 ते 16 मजुरांची टोळी लागते. यासाठी कारखानदार वाहन मालकास पाच ते सहा लाख रुपये देतात. परंतु यासाठी अनेक कागदपत्रांवर सह्या करून रक्कम फेडून घेण्याची कायदेशीर तरतूद केली जाते. या रकमेत टोळी येत नसल्याने वाहतूकदार बँका, पतसंस्था, सावकारांकडून रक्कम घेऊन टोळीची जमवाजमव करतात.
मात्र यातील अनेक टोळ्या तोडणीस येत नाहीत. यातून वाहतूकदारास लाखो रुपयांचा गंडा बसतो. मागील दोन वर्षात सुमारे 500 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. अर्थात ही आकडेवारी तक्रार दिलेल्या वाहतूकदारांची आहे. पोलिसांत न गेलेल्यांची आकडेवारींचा अंदाज केल्यास फसवणुकीचा आकडा सुमारे एक हजार कोटी रुपयांपर्यंत जातो.
हे पैसे वसूल करण्यासाठी संबधित भागात गेल्यास वाहतूकदारांना तेथील पोलिस सहकार्य करीत नाहीत. त्या गावातील ग्रामस्थांकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. प्रसंगी मारहाण केली जाते. अनेकांच्या खुनाच्या घटना घडल्या आहेत. याबाबत कारखानदारही सहकार्य करीत नाहीत.
यासाठी नियुक्त असलेली शासकीय यंत्रणा म्हणजे साखर आयुक्त कार्यालय याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. यामुळे वाहतूकदार हतबल झाले आहेत. अनेकांनी रक्कम फेडण्यासाठी जमिनी विकल्या आहेत. काहींनी कर्ज फेडणे जमत नसल्याने आत्महत्या केल्या आहेत. यातून शेकडो, हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.
फसवणुकीचे वाढते प्रकार थांबविण्यासाठी तसेच फसवणुकीची रक्कम वसूल होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यातील वाहतूकदारांची संघटना बांधणी सुरू केली आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मेळावे सुरू आहेत. साखर आयुक्तांबरोबर लवकरच बैठक होणार आहे. माथाडी कामगार संघटनेप्रमाणे तोडणी मजुरांची कायदेशीर नोंदणी गोपीनाथ मुंडे मंडळाखाली करण्यात यावी. फसवणूक करणार्या मजुरांच्या 7/12 व इतर संपत्तीवर रकमेचा बोजा चढविण्यात यावा. तसेच वसुलीसाठी तातडीने गुन्हे नोंद करून संबधितांना अटक करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
– संदीप राजोबा, वाहतूकदार संघटना सुकाणू समितीचे प्रमुख
तोडणी मजुरांकडून होणारी वाढती फसवणूक रोखण्यासाठी कायदा आहे. पण त्याची अंमलबजावणी प्रभावी होत नाही. त्यामुळे पोलिसांनी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वेेगळे पथक निर्माण करण्याची गरज आहे. तसेच फसवणूक केलेल्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. तरच याला या फसवणुकीला काही प्रमाणात आळा बसेल.
तोडणी मजुरांकडून होणारी वाढती फसवणूक, ऊस तोडणीसाठी शेतकर्यांना मोजावे लागणारे पैसे, तसेच वाढते ऊस क्षेत्र पाहता भविष्यात हार्वेस्टर मशिनशिवाय पर्याय राहणार नाही. यासाठी शेतकर्यांनी उसाची सरी साडेचार ते पाच फूट ठेवणे आवश्यक आहे. यातून उत्पादन वाढण्याबरोबर तोडणीही लवकर होईल. तसेच मजुरांची आवश्यकता संपून फसवणुकीचे प्रमाण कमी होईल.
कोल्हापूर : 1479 सांगली : 1790
सातारा : 1173 पुुणे :1525
सोलापूर :1980 उस्मानाबाद : 455
नगर :499 नाशिक : 200
नंदुरबार :43 जळगाव : 152
औरंगाबाद : 221 जालना : 31
बीड : 141 परभणी : 162 हिंगोली : 18 नांदेड : 5 लातूर : 317
बुलढाणा : 2 यवतमाळ : 46 वर्धा : 19 एकूण : 10258.
जिल्हानिहाय फसवणुकीची रक्कम (लाखांत)
कोल्हापूर 2223.18 सांगली : 6718.85 सातारा : 5123.41 पुणे : 7227.56 सोलापूर :11964.22
उस्मानाबाद :2015.07 नगर : 2123.65 नाशिक : 945.96 नंदुरबार :123. 99 जळगाव :360.3
औरंगाबाद :1151.66 जालना : 263.38 बीड : 569.93 परभणी : 431.64 हिंगोली : 114.4 नांदेड : 45 लातूर : 1766.58
बुलढाणा : 12.2 यवतमाळ : 109.63 वर्धा : 61.77 नागपूर : 154.43
एकूण : 44626. 81 लाख.