सांगली : येथील सिव्हिल रुग्णालयात जिल्ह्यातील बालकांची तपासणी करण्यात आली.  
सांगली

Sangli News : जिल्ह्यात ४८ बालकांवर होणार मोफत हृदयशस्त्रक्रिया

‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत २०८ बालकांची २डी इको तपासणी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाद्वारे संशयित बालकांसाठी मोफत '२डी इको' तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित या शिबिरामध्ये जिल्ह्यातील २०८ बालकांची हृदयतपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४८ बालकांवर मुंबई येथील रुग्णालयात मोफत हृदय शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

शिबिराचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. शाळा व अंगणवाड्यांमधील आरोग्य तपासणीतून संदर्भित करण्यात आलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात मुंबईतील बालाजी हॉस्पिटलच्या बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री मिश्रा यांनी बालकांची '२डी इको' तपासणी केली.

तपासणीअंती ४८ बालकांना हृदय शस्त्रक्रियेची गरज असल्याचे स्पष्ट झाले असून, ३५ बालकांवर औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच ४० बालकांना पुढील सहा महिन्यांनंतर पुन्हा तपासणीचा सल्ला देण्यात आला आहे. शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या बालकांना मुंबई येथील रुग्णालयात मोफत प्रवास, निवास व भोजनाच्या व्यवस्थेसह पाठवण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या संयुक्त समन्वयाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. डिसेंबरअखेर जिल्ह्यातील सर्व मंजूर शाळांची आरोग्य तपासणी आणि १०० टक्के संदर्भसेवा पूर्ण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. आजअखेर जिल्ह्यातील १,९५० बालकांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया, तर २५,३३४ बालकांवर इतर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT