Fraud Case Pudhari
सांगली

Sangli Solar Project Fraud: सौर प्रकल्पाच्या आमिषाने ४६ लाखांचा गंडा

आरळा येथील शेतकऱ्याची तक्रार : दोघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

कोकरूड : शेतजमिनीवर सौर प्रकल्प उभारून दरमहा मोठी रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवत आरळा (ता. शिराळा) येथील ७७ वर्षीय शेतकऱ्याची ४६ लाख ४२ हजार २२ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोकरूड पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश गोविंद पटवर्धन (वय ७७, रा. आरळा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहिणी देशपांडे आणि रुपेश रेड्डी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२३ या कालावधीत संशयितांनी पटवर्धन यांच्याशी मोबाईलवरून वारंवार संपर्क साधला. त्यांच्या शेतजमिनीवर सुमारे ३ कोटी ६७ लाख २० हजार रुपयांचा सौर प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, त्यातून पुढील २५ वर्षे दरमहा सुमारे ४ लाख ३६ हजार रुपये उत्पन्न मिळेल, असे आमिष दाखवले.

यासाठी शेतजमिनीचा सातबारा उतारा व कागदपत्रे ई-मेलवर मागवून घेतली. सुरुवातीला ३ एकर जमिनीच्या शुल्कापोटी एकरी १३ हजार रुपये शुल्क भरण्यास सांगण्यात आले. शुल्क भरल्यानंतर इतर कारणांसाठी विविध बँक खात्यांमध्ये, गुगल-पे, फोन-पे आणि रोख स्वरूपात एकूण ४६ लाख ४२ हजार २२ रुपये मागवून घेतले. मात्र, एवढी रक्कम घेऊनही सौर प्रकल्पाचे कोणतेही काम न करता पैसे परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे पटवर्धन यांच्या लक्षात आले.

याप्रकरणी कोकरूड पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक ज्योती सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT