farmer loan waiver pudhari photo
सांगली

Sangli Farmer Loan Waiver : ३० हजार शेतकऱ्यांना २०४ कोटींची कर्जमाफी

चौथ्या यादीतील ८,४८४ शेतकऱ्यांना बायोमेट्रिक प्रमाणीकरणानंतर मिळणार रक्कम

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पहिल्या तीन याद्यांमधील ३० हजार २७५ शेतकरी सभासदांना २०४ कोटी १५ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. दरम्यान, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या चौथ्या यादीत जिल्ह्यातील आणखी ८ हजार ४८४ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, बँक खात्याशी संबंधित आवश्यक ओळख प्रमाणीकरण पूर्ण होताच ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे.

शासनाने या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ६८ हजार ९८१ कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर नोंदवली होती. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची ५६ हजार ९६२, तर राष्ट्रीयकृत बँकांची १२ हजार १९ खाती आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या चारही याद्या मिळून जिल्ह्यातील ५२ हजार १८४ शेतकरी पात्र ठरले आहेत. निकषांनुसार बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरच प्रत्यक्षात निधी जमा केला जात आहे.

जिल्हा बँकेमार्फत मिळालेल्या लाभात जत तालुक्याने आघाडी घेतली असून तेथील सर्वाधिक ८ हजार ५१० शेतकऱ्यांना ५६ कोटी ६ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. त्यापाठोपाठ तासगाव तालुक्यातील ४ हजार ९४१ शेतकऱ्यांना ३६ कोटी ९३ लाख, तर मिरज तालुक्यातील ४ हजार ५३५ शेतकऱ्यांना ३३ कोटी ५ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.

प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा कायम

दुसरीकडे, पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७७ हजार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठवण्यात आली आहे. मात्र, पात्र लाभार्थ्यांची प्रत्यक्ष यादी अद्याप जाहीर न झाल्याने शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT