सांगली ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 23 खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी ना-हरकत प्रमाणपत्र न घेता शाळा सुरू ठेवल्या आहेत. त्या शाळांनी तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र घेण्याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सूचना दिल्या होत्या. शिक्षण विभागाकडून अंतिम नोटीस काढण्यात येणार असून प्रमाणपत्र सादर न झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
शाळेस कोणत्याही मंडळाची संलग्नता घेण्यासाठी शासनाच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. अशी प्रमाणपत्रे घेऊन सुरू करण्यात आलेल्या शाळांची ना हरकत प्रमाणपत्रे 4 मार्च 2020 च्या शासन आदेशानुसार रद्द केली आहेत.ना हरकत प्रमाणपत्र नसणार्या शाळां अनाधिकृत शाळा म्हणून जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
यामध्ये जिल्ह्यातील ए. बी. पाटील इंग्लिश स्कूल सांगली, आप्पासाहेब बिरनाळे, केंब्रीज स्कूल मिरज, तक्षशिला स्कूल सांगली, पोदार इंटनॅशनल स्कूल सांगली, शांतम स्कूल अंकली, मेर्स विश्वशांती गुरुकुल स्कूल कर्नाळ, नवकृष्णा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल कुपवाड, सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत, डिवाईन इंटनॅशनल स्कूल कुंडल रोड विटा, शायनिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल विटा, आदर्श पब्लिक स्कूल विटा, नवोदय विद्यालय पलूस, अॅकॅडमिक हाय अॅन्ड ज्यु कॉलेज कुंडल, क्रांती इंटनॅशनल पब्लिक स्कूल कुंडल, वारणा व्हॅली स्कूल सागाव, आनंदसागर पब्लिक स्कूल चिंचणी, आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल तासगाव, डी. के. पाटील इंग्लिश स्कूल तासगाव, ज्ञानदीप इंटनॅशनल स्कूल साखराळे, व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूल पेठ, कुसुमगोंडा प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल साखराळे, अण्णासाहेब डांगे इंटनॅशनल स्कूल इस्लामपूर, प्रकाश पब्लिक स्कूल उरुण इस्लामपूर या शाळांचा समावेश असल्याचे पुढे आले.
सरकारची मान्यता घेऊन खासगी शाळा सुरू झाल्या आहेत. आरटीई कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्याची कोट्यवधी रुपयाची थकबाकी सरकारकडे आहे. तरीसुद्धा परिपूर्ती मान्यतेसाठी अडवणूक केली जात आहे, हे चुकीचे आहे. त्याचा आम्ही सर्व शाळांनी बैठकीत निषेध केला आहे. हे यापुढे असेच सुरू राहिल्यास प्रसंगी आम्ही सर्व शाळा आंदोलन करणार आहे, असे खासगी इंग्रजी शाळा संघटनेचे अध्यक्ष बाहुबली कबाडगे यांनी सांगितले.