ट्रेकिंगसाठी आलेल्या १८ वर्षांच्या तरुणाचा फिट आल्यामुळे मृत्यू 
सांगली

Sangli News : ट्रेकिंगसाठी आलेल्या १८ वर्षांच्या तरुणाचा फिट आल्यामुळे मृत्यू

येडेनिपाणीतील मल्लिकार्जुन डोंगरावरील घटना; मृत म्हैसाळ गावचा

पुढारी वृत्तसेवा

येडेनिपाणी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान येथे ट्रेकिंगसाठी आलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील तरुणाचा अचानक फिटस्‌चा त्रास होऊन मृत्यू झाला. ही घटना बुधवार (दि. २) रोजी घडली. विशाल काशीनाथ वाघमोडे (वय १८) असे मृताचे नाव आहे. विशाल हा मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी आला होता.

सकाळी म्हैसाळ येथील एका ॲकॅडमीतील काही तरुण ट्रेकिंगसाठी मल्लिकार्जुन डोंगरावर आले होते. विशाल काही मित्रांसमवेत डोंगर चढून पायथ्याशी आला. त्यानंतर ते पुन्हा दुसऱ्यांदा डोंगर चढणार होते. ट्रेकिंगदरम्यान विशालला अचानक अस्वस्थ वाटू लागले. मित्रांनी त्याला येडेनिपाणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, फिटस्‌चा जोरदार झटका आल्याने त्याची प्रकृती बिघडली. पुढील उपचारासाठी त्याला ईश्वरपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. विशालच्या अकाली निधनाची बातमी म्हैसाळ परिसरात समजताच खळबळ उडाली. अवघ्या १८ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला. या घटनेने येडेनिपाणी येथील मल्लिकार्जुन देवस्थान परिसरातही शोककळा पसरली.

वर्षात दोघांचा मृत्यू

वर्षभरात मल्लिकार्जुन डोंगरावर ट्रेकिंगदरम्यान मृत्यूची ही दुसरी घटना आहे. गेल्याच वर्षी डोंगर चढताना ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील एका तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT