सांगली : विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे २ लाख २० हजार रुपये किमतीचे १६ मोबाईल शोधण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. हे सर्व मोबाईल कायदेशीर पडताळणी करून संबंधित नागरिकांना पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते परत करण्यात आले.
विश्रामबाग पोलिस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी विविध नागरिकांनी दाखल केल्या होत्या. यावर पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप भागवत यांनी हे गहाळ मोबाईल तातडीने शोधून मूळ मालकांना परत करण्याचे आदेश दिले होते. या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव व सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कांचन यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकातील पोलिस नाईक मोरे, पोलिस कॉन्स्टेबल चौगुले आणि पोलिस कॉन्स्टेबल जगदाळे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अत्यंत कौशल्याने तपास करून या १६ मोबाईलचा शोध लावला.
पोलिस ठाण्यात आयोजित एका विशेष कार्यक्रमात पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते नागरिकांना त्यांचे हे हक्काचे मोबाईल सन्मानाने परत करण्यात आले. गहाळ झालेले मोबाईल सुखरूप परत मिळाल्यामुळे संबंधित नागरिकांनी सांगली पोलिसांच्या या तत्पर कामगिरीबद्दल जाहीर आभार मानले. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या वतीने गहाळ मालमत्ता शोधण्याची ही मोहीम यापुढेही अशीच सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.