सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये नद्यांना आलेला पूर, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे 95 हजार 86.81 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 1 लाख 49 हजार 366 शेतकर्यांना याचा फटका बसला आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे झाल्यानंतर शासनाकडून 150 कोटी 71 लाख 526 रुपयांची नुकसान भरपाई सांगली जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. आतापर्यंत 68 कोटी रुपये भरपाईचे वितरण झाले असून, ई-केवायसी किंवा अॅग्रीस्टॅक (शेतकर्यांचे ओळखपत्र) नोंदणी नसल्यामुळे भरपाईच्या वितरणामध्ये अडथळे निर्माण झाले आहे.
शासनाने जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी 8 हजार 500, बागयत क्षेत्रासाठी 17 हजार, तर फळपीकांसाठी 22 हजार 500 रुपयांची मदत जाहीर केली आहे. नुकसान भरपाईसाठी तीन हेक्टरची मर्यादा घालण्यात आली आहे. या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून 150 कोटी 71 लाख 526 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांची यादी अपलोड केली आहे. सोमवारअखेर 41 हजार शेतकर्यांना 68 कोटी रुपयांच्या भरपाईचे वितरण करण्यात आले आहे. मदतीच्या वितरणामध्ये अनेक शेतकर्यांची ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने ई-केवायसी पूर्ण करावी किंवा अॅग्रीस्टॅक (शेतकर्यांचे ओळखपत्र) काढून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ही मदत थेट शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.
याबाबत ज्यांच्या अडचणी किंवा तक्रारी आहेत, त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांची यादी शासनाला प्राप्त झाली आहे. ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे, त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.