सांगली : ‘अँटिक्विटी ब्लू’, ‘रॉयल चॅलेंज’, ‘बॅगपायपर’ आणि ‘ओल्ड मंक’ यांसारख्या लोकप्रिय व्हिस्की आणि रम ब्रँडच्या विशिष्ट प्रकारांच्या विक्रीवर ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया’ (FSSAI) ने बंदी घातली आहे. मद्य योग्यरीत्या परिपक्व झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी कृत्रिम आणि नैसर्गिक-सदृश फ्लेवरिंग एजंट्सचा अनधिकृत वापर केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. सांगली जिल्ह्यात या ब्रँडचे शौकीन सुमारे १२ टक्के असून, त्यांना आता दुसऱ्या ब्रँडकडे वळावे लागले आहे.
बंदी घातलेले ब्रँड तुलनेने अधिक किमतीचे आहेत. सांगली जिल्ह्यात या ब्रँडच्या ग्राहकांची संख्या जवळपास १२ टक्के आहे. यामध्ये सर्वाधिक खप ‘ओल्ड मंक’ रमचा आहे. जिल्ह्यात एकूण ७०४ बीअर बार, तर ८३ वाईन शॉप आहेत. यामधून सुमारे १२ टक्के रम आणि व्हिस्कीचा खप होतो. वर्षाला एकूण विदेशी दारूचा खप साडेसात लाख लिटरच्या घरात आहे. यातील या रम आणि व्हिस्कीचा खप १२ टक्के आहे.
‘अँटिक्विटी ब्लू’, ‘रॉयल चॅलेंज’, ‘बॅगपायपर’ आणि ‘ओल्ड मंक’ या व्हिस्की आणि रमचा सध्या पुरवठा बंद आहे. ही बंदी तात्पुरती असावी. यांचे ग्राहक सध्या इतर ब्रँडकडे वळले आहेत. काही ग्राहकांकडून या ब्रँडची मागणी होत आहे. याला पर्याय म्हणून दोन ते तीन पर्यायी ब्रँडची मागणी होत आहे. मद्याचे शौकीन आपल्याला आवडणारेच ड्रिंक घेतात. त्यामुळे सध्या त्यांची अडचण होत आहे.- लहू भडेकर, अध्यक्ष, सांगली जिल्हा बीअर बार, हॉटेल असोसिएशन