सांगली : अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने पुन्हा संधी उपलब्ध करून दिली आहे. तीन नियमित आणि सहा विशेष फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या विशेष प्रक्रियेअंतर्गत महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना २७ ऑगस्टपर्यंत वाटप झालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.
अकरावीचे वर्ग सुरू होऊन काही कालावधी लोटला असला तरी विविध कारणांमुळे काही विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप अंतिम झालेले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यात आली आहे. या फेरीसाठी २३ ऑगस्टपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरून तो लॉक केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंती व उपलब्ध जागांनुसार महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले आहे. ही ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रवेशाचा टप्पा सुरू झाला आहे. वाटप झालेल्या महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपला प्रवेश निश्चित करणे अपेक्षित आहे. त्यासाठी २७ ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी प्रवेश प्रक्रिया करावी, असे आवाहन करण्यात आले.