सांगली

Sangali: तळपत्या उन्हात पशू-पक्षी झाले सैरभैर

backup backup

ऐतवडे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा: वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. पाण्याचे बहुतांश स्त्रोत कोरडे पडू लागले आहेत. तळपत्या उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले असून, पशू-पक्षीही पाण्याच्या शोधासाठी सैरभैर झाले आहेत. त्यांच्यासाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.

यावर्षी उन्हाळा तीव्र असल्याने बहुतांश पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पक्ष्यांना पाण्यासाठी अन्यत्र जावे लागत आहे. दूषित पाणी आणि उष्माघातामुळे काही पक्ष्यांना जीवाला मुकावे लागले आहे. ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी पक्षी जवळच असणार्‍या झाडांवर घरटे करतात. उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी काही पक्षी पाण्यात पोट ओले करून बसतात. त्यामुळे तापमान नियंत्रित राहते. ही देणगी त्यांना निसर्गाकडून मिळालेली आहे.

शिराळ्यात सामाजिक वनीकरण विभागाचे मोठे क्षेत्र आहे. यात बगळे, चिमण्या, कावळे आदींची संख्या मोठी आहे. बिबटे, लांडगे, कोल्हे आदी जंगली प्राण्यांचा वावरही त्या ठिकाणी आहे. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. वनीकरण विभागाने कोरडे पाणवठे भरून घेण्याची मागणी वन्यप्रेमींमधून होत आहे.

चिडियाघर संकल्पना राबवा

चांदोली अभयारण्य, सागरेश्वर अभयारण्य रामलिंग बेट-बहे, नरसिंह घाट, सांगली येथील आमराई, कृष्णाघाट, यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वेगवेगळे पक्षी पहायला मिळतात.पशुसंवर्धनासाठी प्राणीसंग्रहालय उभारण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर पक्षांसाठी खास अशी पक्षी घर अथवा चिडियाघर अशी संकल्पना प्रत्यक्षात राबविण्याची गरज आहे, असे मत जिल्हाभरातील पशू-पक्षी प्रेमींमधून व्यक्त केले जात आहे.

जंगलात पाणवठे तयार करा : सन्मतीचे आवाहन

झाडे, इमारती, मंदिरे, बगीचे, कॉलनी परिसरातील मोकळ्या जागा, जुन्या इमारती आदी ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, तसेच वनविभागाने जंगलांमध्ये पाणवठे तयार करून त्यात टँकरद्वारे पाणी सोडण्याचे आवाहन सन्मती संस्कार मंचच्या संघटकांनी केले आहे. काही शाळांमध्ये प्लास्टिकचा वापर करून पक्ष्यांसाठी पाणी व्यवस्थाही करण्यात आली आहे. अशा पद्धतीचे प्रयोग शाळांनी करावे, असे आवाहन पक्षीप्रेमींनी केले आहे.

SCROLL FOR NEXT