सांगली

सांगली : कोसारी येथे भरदिवसा खून; अनैतिक संबंधातून एकास चाकूने भोसकले

दिनेश चोरगे

जत; पुढारी वृत्तसेवा : कोसारी (ता. जत) येथे अनैतिक संबंधाच्या कारणावरून भरदिवसा एकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची घटना घडली. शंकर आप्पाणा तोरवे (वय 55) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. प्राथमिक तपासात अनैतिक संबंधातून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संदीप महादेव नरुटे (वय 29) व संतोष महादेव नरुटे (26) या दोघा सख्ख्या भावांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

तोरवे हे कोसारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष होते. संशयित संदीप व संतोष नरूटे त्यांच्या ओळखीचे होते. त्यांचे संदीप व संतोष यांच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या संबंधाची कल्पना संशयितांना होती. याबाबत दोघांनी तोरवे यांना समज दिली होती. परंतु समज देऊनही तोरवे यांनी संबंध सुरूच ठेवले असल्याचा संशय संशयितांना होता. यातून रविवारी सकाळी तिघांमध्ये वाद झाला. दरम्यान, दुपारी संदीप व संतोष या दोघांनी, 'तुमच्याकडे काम आहे, आमच्याबरोबर चला' असे तोरवे यांना सांगितले. तोरवे हे दोघांबरोबर त्यांच्या घरापासून थोड्या अंतरावर गेले असता, अचानक दोघांनी पाठीमागून दांडक्याने मारले, तर समोरून पोटात चाकूने भोसकले. यात घाव वर्मी लागल्याने तोरवे जागीच कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तोरवे यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच दोघांनीही पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण जवळच तोरवे यांचे नातलग होते. त्यांनी यातील एका संशयिताचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

काही कळण्याच्या आतच गजबजलेल्या गावातील वस्तीमध्ये हा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे व पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी भेट देऊन घटनेचा तपास सुरू केला. या घटनेत अजून कोणाचा सहभाग आहे का? यांना मदत करणारे संशयित आहेत का? याबाबत अधिक चौकशी पोलिस करीत आहेत.

घरापासून अवघ्या 50 मीटरवर घटना

शंकर तोरवे हे गावातच राहायला होते. संशयितांचे घर काही अंतरावर होते. परंतु संदीप व संतोषने, काम आहे असे सांगून अगदी घरापासून 50 मीटर अंतरावर गजबजलेल्या ठिकाणी त्यांना नेऊन, नातलगांच्या समोरच चाकूने सपासप वर्मी घाव केले. गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने हा नियोजित खून असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे, असेही पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT