सांगली

सांगली : समडोळीचे सुरेश पाटील यांचे संचालक पद रद्द

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा : वसंतदादा बँकेतील गैरव्यवहार रकमेच्या थकबाकीपोटी समडोळी (ता. मिरज) येथील शांतीसागर को- ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश जिनगोंडा पाटील यांचे संचालक पद मिरजेचे सहकार उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी रद्द केले आहे.

समडोळी येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष पाटील यांनी अ‍ॅड. सचिन रुगे यांच्यामार्फत सहकार कायदा कलम 73 (क) (अ) (9) (111) नुसार उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीत म्हटले होते की, वसंतदादा बँकेमध्ये सुरेश पाटील हे संचालक असताना त्यांच्या काळात गैरव्यवहार झाल्याचे शाबीत झाले होते. चौकशी अधिकारी अ‍ॅड. आर. डी. रैनाक यांनी चौकशी करून या बँकेमध्ये 195 कोटींचा गैरव्यवहार झाला असल्याचा ठपका तत्कालीन 32 संचालक व त्यांचे वारसदारांवर ठेवला होता. सुरेश पाटील यांना 2 कोटी 46 लाख 13 हजार 355 रुपयास जबाबदार धरले होते. त्यानंतर सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी पाटील यांच्यासह अन्य सर्व 32 जणांविरुद्ध सहकार कायदा कलम 98 अन्वये ती रक्कम वसुलीचे आदेश दिले होते. ही रक्कम बँकेच्या अवसायकांनी शासकीय वसुली समजून वसूल करणेचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जबाबदार संचालकांची मालमत्ता शोधण्याचे काम बँकेमार्फत सुरू आहे.

सहकार कायदा कलम 73 अन्वये एखादी व्यक्ती सहकारी संस्थेची थकबाकीदार असलेस, ती व्यक्ती दुसर्‍या संस्थेमध्ये संचालक राहू शकत नाही.त्यामुळे शांतीसागर को ऑप. क्रेडिट सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष व वसंतदादा बँकेचे तत्कालीन संचालक सुरेश पाटील यांचे शांतीसागर सोसायटीमधील संचालक पद रद्द करणेची मागणी केलेली होती. सहकार उपनिबंधक मिरज यांनी सदरची मागणी मान्य करत त्यांचे संचालक पद रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT