सांगली: येथे गुरुवारी ज्येष्ठ रंगकर्मी सई परांजपे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी याच्याहस्ते विष्णुदास भावे गौरवपदक प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. शरद कराळे, विलास गुप्ते, मेधा केळकर, प्रा. डॉ. भास्कर ताम्हणकर आदी उपस्थित होते. (छाया : सचिन सुतार) 
सांगली

Sangli|'रंगभूमीची सेवा नव्हे; दोस्ती' : सई परांजपे

लोककलांचे मागणे थोडे आणि देणे अफाट; भावे गौरव पदकाने सन्मान

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

रंगभूमीची मी सेवा केली, असे म्हणू नका. तसे काही नसते, तर मी रंगभूमीशी दोस्ती केली, असे म्हणा, असे मनोगत ज्येष्ठ रंगकर्मी आणि चित्रकर्मी सई परांजपे यांनी व्यक्त केले. तमाशा अर्थातच लोककलांचे मागणे थोडे आणि देणे अफाट, अशा शब्दात त्यांनी लोककलांच्या सामर्थ्याचे कौतुक केले. उत्तम रंजनावर पोसलेली प्रजा ही प्रामाणिक असते, असे त्यांचे मार्मिक विधान.

निमित्त 'विष्णुदास भावे गौरव पदक' प्रदान सोहळ्याचे. येथील भावे नाट्यगृहात काल, गुरुवारी हा सोहळा झाला. सई परांजपे यांना अभिनेते मोहन जोशी यांच्याहस्ते हे पदक प्रदान करण्यात आले. उशिरा का होईना, या संस्थेने माझी दखल घेतली, त्याबद्दल आभार मानते, अशा वाक्याने सई परांजपे यांनी भाषणाची नांदी केली. त्यांनी रंगभूमीच्या दीर्घ प्रवासातील काही महत्त्वाचे टप्पे कथन केले. अत्यंत मनस्वी, प्रांजळ असे त्यांचे मनोगत रसिकांना भावले.

लिहिलेली, दिग्दर्शित केलेली, गाजलेली आणि इतकेच काय, पडलेल्या नाटकांचे त्यांनी सांगितलेले अनुभव मजेशीर होते, ते खूप काही सांगणारे होते. तो नाट्य प्रवासातील साक्षीदार दस्तऐवज.

एका तमाशाप्रधान अनुवादीत हिंदी नाटकातील एक अनुभव सई परांजपे यांनी सांगितला. प्रयोगाला शास्त्रज्ञ मंडळी आलेली. कृष्ण आणि पेंद्या गवळींचा रस्ता अडवतात. कृष्ण म्हणतो, अरे यांचा रस्ता अडवून यांना कुठं घेऊन जायचं? यावर पेंद्या म्हणतो, अरे यार 'फंडामेंटल रिसर्च' करेंगे. यावर शास्त्रज्ञ मंडळींनी हास्यकल्लोळाने दाद दिली होती. अशा अनेक अनुभवांच्या खजिन्यातील काही मोती सांगलीकर रसिकांना मिळाले. विविध संस्था, संघटनांतर्फे सई परांजपे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी स्वागत केले. डॉ भास्कर ताम्हणकर यांनी प्रास्ताविक केले. धनश्री कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

सई परांजपे यांचा मोठेपणा : मोहन जोशी

सई परांजपे आणि माझी यापूर्वीच भेट झाली असती, तर मी एक वेगळा दिसलो असतो. दुर्दैवाने त्यांची आज पहिल्यांदाच माझी भेट झाली. माझ्याहस्ते सई परांजपे यांनी पदक स्वीकारले, हा त्यांचा मोठेपणा. ते माझ्याहस्ते पुरस्कार स्वीकारतील का?, अशी माझ्या मनात शंका होती. त्यांच्या पुढील कार्यास माझ्याकडून शुभेच्छा !

आनंददायी वाचन

सई परांजपे यांनी लिहिलेले आणि गाजलेले एक नाटक म्हणजे 'माझा खेळ मांडूद्या'. या नाटकातील एका प्रसंगाचे अभिवाचन सई परांजपे यांनी केले आणि भाषणाची सांगता केली. हे वाचनही रसिकांना समाधान देऊन गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT