सह्याद्री व्याघ्र राखीवसह तीन अभयारण्यात 1556 वन्यजिवांची नोंद 
सांगली

Wildlife Sanctuary : सह्याद्री व्याघ्र राखीवसह तीन अभयारण्यात 1556 वन्यजिवांची नोंद

बुध्द पौर्णिमेस ‌‘निसर्गानुभव‌’ उपक्रमास प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

आष्पाक आत्तार

वारणावती : सह्याद्री व्याघ्र राखीव, राधानगरी वन्यजीव अभयारण्य व सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाणस्थळांवरील प्राणी पाहणी ‌‘निसर्गानुभव‌’ कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 1 मे रोजी पार पडलेल्या या उपक्रमात एकूण 1556 वन्यप्राणी, पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांची नोंद घेण्यात आली.

दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाश अधिक असल्याने वन्यजीव पाणवठ्यांवर येण्याचे प्रमाण वाढते. याच पार्श्वभूमीवर हा विशेष उपक्रम आयोजित केला जातो. क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. तीनही अभयारण्यांतील एकूण 134 मचाणांवर 175 वनकर्मचारी आणि 228 निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला.

यंदाच्या पाहणीत मांसाहारी प्राण्यांमध्ये 5 बिबट्यांच्या अप्रत्यक्ष खुणा आढळून आल्या. तसेच 240 सांबर, 165 चितळ, 32 अस्वल, 23 भेकर, 18 मुंगूस, 21 रानकुत्री, 7 उदमांजर, 23 शेकरू, 1 कोल्हा, 3 रानमांजर, 18 रानडुकरे, 27 ससे, 247 रानगवे, 71 रानम्हशी, 61 माकडे, 18 साळिंदर, 1 तरस, 1 उंदीर व 4 पिसोरी यांची नोंद करण्यात आली. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये 2 धामण, 2 नाग, 2 घोणस, 1 अजगर, 1 सरडा व 10 घोरपडी आढळून आल्या. याशिवाय जवळपास 100 फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद निसर्गप्रेमींनी केली. वन विभागाच्या या उपक्रमामुळे जैवविविधतेचे संवर्धन, वन्यजिवांची संख्या आणि त्यांच्या अधिवासाबाबत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

समृध्द पक्षीसंपदा...

पक्षी निरीक्षणामध्ये 4 हरियाल पक्षी, 3 नाईट जार, 2 खंड्या पक्षी, 2 घारी, 2 कोकिळा, 1 पांढऱ्या गालाचा बार्बेट, 1 मलबार शिटेबाज थ्रश, 1 मोठा बुलबुल, 1 आशियाई परिनिळा पक्षी, 14 होला, 12 रेड व्हेंटेड बुलबुल, 2 पिवळा पक्षी, 108 रानकोंबडे, 7 धनेश, 1 ब्राह्मणी घार, 2 भारतीय सीमेटर बॉबलर, 1 बुलबुल, 1 तांबड्या पाठीचा सूर्यपक्षी, 1 शिपाई बुलबुल, 1 सातभाई, 1 पांढरे राखाडी घुबड, 4 पोपट, 68 मोर, 6 घुबड व 1 पारवा यांची नोंद घेण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT