वारणावती : राज्यात दर चार वर्षांनी होणाऱ्या व्याघ्रगणनेचा पहिला टप्पा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पूर्ण झाला आहे. या गणनेत सह्याद्रीत वाघांचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे. ‘राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरण’ आणि ‘भारतीय वन्यजीव संस्था’ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य वन विभागाने ही गणना यंदा आधुनिक पद्धतीने राबवली आहे.
राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये ही गणना 12 जानेवारीपासून सुरू होऊन 17 जानेवारीरोजी पूर्ण झाली. यंदा प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाघांची उपस्थिती, त्यांचा वावर व अधिवासाची माहिती संकलित करण्यात आली. यापूर्वी केवळ पदमार्ग, ओरखडे व पाऊलखुणांच्या आधारे अंदाज घेतला जात होता; मात्र यंदा मोबाईल ॲप, जीपीएस, कॅमेरा ट्रॅप्स आणि डिजिटल नोंदींचा वापर करण्यात आला.
ही व्याघ गणना तीन टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्यात वन क्षेत्रात वाघांच्या हालचालींचे प्रत्यक्ष पुरावे नोंदवले जातात. दुसऱ्या टप्प्यात उपग्रह तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जंगलातील पाणी, अन्नस्रोत व मानवी हस्तक्षेपाचा अभ्यास केला जातो. तिसऱ्या टप्प्यात कॅमेरा ट्रॅप्सच्या माध्यमातून वाघांची अचूक संख्या निश्चित केली जाणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले की, दर चार वर्षांनी वाघ गणना केली जाते. यंदा पहिल्याच टप्प्यात सह्याद्रीतील वाघांचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे. ही गणना पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीने व ऑनलाईन अहवाल प्रणालीद्वारे केली जात आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघ संवर्धनासाठी ही गणना महत्त्वाची ठरणार असून, पुढील काळात संरक्षण, अधिवास सुधारणा आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे. सह्याद्रीतील जंगलात वाघ पुन्हा सक्रिय होत असल्याचे संकेत मिळाल्याने वन्यजीवप्रेमी, पर्यावरण अभ्यासकांत समाधान व्यक्त होत आहे.