आष्पाक आत्तार
वारणावती : सह्याद्रीतील वाघांच्या वंशवृद्धीसाठी चांदोली परिसरात चंदा आणि तारा वाघिणी सोडण्यात आल्या आहेत. सह्याद्रीत यापूर्वीच सेनापती, सुभेदार आणि बाजी हे तीन नर वाघ आहेत. यातील कोणती वाघीण कोणत्या वाघाच्या संपर्कात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन महिन्यांनंतर सुरुवातीला सोडण्यात आलेली चंदा वाघीण ही सेनापती वाघाच्या संपर्कात आली आहे. सह्याद्रीमध्ये लवकरच वाघांची नैसर्गिक संख्या वृद्धिंगत होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
सह्याद्रीमध्ये वाघांची संख्या पूर्ववत करण्यासाठी सन 2017 मध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव, भारतीय वन्यजीव संस्था देहरादून व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त सहकार्याने ‘वाघ पुनर्स्थापना’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यानंतर 9 ऑक्टोबर 2023 रोजी पुनर्स्थापनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली. त्यानुसार ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पमधील 3 नर व 5 मादी वाघांचे सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये स्थलांतरणाला सुरवात झाली.
मागील तीन वर्षांपासून तीन नर वाघांची नोंद झाली असून, त्यांचा सह्याद्रीमध्ये नैसर्गिक अधिवास तयार झाला आहे. परंतु सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये वाघांचे नैसर्गिक वाढ व प्रजनन प्रक्रियेच्या दृष्टीने मादी वाघांची आवश्यकता असल्याने चंदा व तारा या वाघिणीचे स्थलांतरण करण्यात आले. पण त्यानंतर स्थलांतरित केलेल्या मादी व नर वाघांचा एकत्र वावर होणे, ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण होती आणि ती यशस्वी होताना दिसत आहे. पथकाच्या निरीक्षणावरून व कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झालेल्या एकत्रित माहितीवरून मागील एक आठवड्यापासून, चांदोली वन्यजीव विभागांतर्गत वनपरिक्षेत्र आंबामध्ये सेनापती व चंदा यांचा सोबत वावर असल्याचे सिध्द झाले आहे. प्रजनन प्रक्रियेच्या दृष्टीने ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सह्याद्रीमध्ये लवकरच वाघांची नैसर्गिक संख्या वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.