Sahyadri Tiger Reserve Pudhari Photo
सांगली

Sahyadri Tiger Project : सह्याद्रीत वाघ पुनर्वसन यशस्वी

उर्वरित 5 वाघांना तात्पुरती स्थगिती : वंशवृद्धीची प्रतीक्षा : जैवविविधतेला नवे बळ

पुढारी वृत्तसेवा

आष्पाक आत्तार

वारणावती : केंद्राच्या व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील दिल्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ सोडण्याच्या हालचालींना वेग आला. ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून आठ वाघ सह्याद्रीत सोडण्याचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी तीन वाघांची यशस्वीरीत्या सोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. सध्या उर्वरित पाच वाघांच्या सोडण्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, सह्याद्रीतील दाट जंगल आणि समृद्ध परिसंस्था वाघांच्या वास्तव्य आणि प्रजननासाठी अनुकूल ठरत आहे. वाघांची संभाव्य वंशवृद्धी या भागातील जैवविविधतेला बळ देणार असून चांदोली परिसरातील पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलेल्या वाघिणी तसेच त्यांच्या रोचक हालचालींमुळे हा प्रकल्प सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. चांदोली आणि कोयना अभयारण्यातील जंगलात सोडण्यात आलेल्या चंदा, तारा आणि हिरकणी या वाघिणी आता परिसरात पूर्णपणे रुळल्या आहेत.

कोयना जंगलात हिरकणीच्या आगमनानंतर ‌‘बाजी‌’ या नर वाघाने अवघ्या सात दिवसांत तब्बल 150 किलोमीटरचा प्रवास करून उदगीरचे पठार गाठल्याची नोंद वन विभागाने केली आहे. त्यामुळे चांदोली परिसरात सेनापती, सुभेदार, शिलेदार आणि बाजी असे चार नर वाघ सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणलेली चंदा वाघीण व सह्याद्रीतील आधीपासून असलेल्या सेनापती या नर वाघासोबत तिचे मीलन झाल्याने वंशवृद्धीची आनंदाची बातमी लवकरच मिळण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT