वारणावती : सह्याद्रीत विशेष व्याघ्र संरक्षण दल लवकरात लवकर मंजूर व्हावे, यासाठी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे लेखी पाठपुरावा केला आहे. स्मरणपत्र म्हणून यापूर्वी केलेल्या पाठपुराव्याच्या प्रति पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सह्याद्रीत विशेष व्याघ्र संरक्षण दल कार्यरत होण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
‘सह्याद्रीत वाघांचं आगमन सुरक्षेचे काय? बारा वर्षांपासून विशेष व्याघ्र संरक्षण दल कार्यरत नाही’ या मथळ्याखाली दि. 4 डिसेंबररोजी ‘पुढारी’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी घेतली असून लगेचच शासनाकडे मागणीचा पाठपुरावा केला आहे.
सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र हा पश्चिम घाटातील एकमेव अतिसंवेदनशील व्याघ्र प्रकल्प आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प एकूण 1165.57 चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा कोयना व चांदोली धरण क्षेत्राच्या पाणीसाठ्याच्या बाजूने असून संपूर्ण क्षेत्र हे दऱ्याखोऱ्यांनी, कडेकपारींनी, तीव्र उतार व घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. वनसंवर्धन व संरक्षण, तसेच वन विकासाची इतर कामे करणे, गस्तीकरिता जंगलातून पायी फिरणे याकरिता सध्या कार्यरत असणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचे अस्तित्व वाढत आहे. येथे कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दल, मेळघाट व्याघ्र प्रकल्प व नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकरिता राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडून ज्याप्रमाणे ‘एसटीपीएफ’ स्थापन करण्यास मंजुरी दिलेली आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प अतिसंवेदनशील क्षेत्रात समाविष्ट असून वाघांच्या वाढत्या परिभ्रमणामुळे व वाढत असलेल्या अस्तित्वामुळे भविष्यात शक्यता नाकारता न येणाऱ्या अवैध शिकारी, तस्करी, अशा अनुचित घटनाना प्रतिबंध घालण्याकरता विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.
राज्यातील सध्याचे मानव वन्यजीव संघर्षाचे स्थितीचा विचार करता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकरिता विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्यास मंजुरी मिळण्याबाबत शासन स्तरावरून विचार होण्यास विनंती आहे, असे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. आता तारा वाघीणही बफर झोनमध्ये मुक्त फिरत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. तारापाठोपाठ आणखी सात वाघ चांदोलीत सोडण्यात येणार आहेत. हे वाघ सोडण्यापूर्वी हे दल कार्यरत होणे गरजेचे आहे.