वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानात सध्या दोन बलाढ्य नर वाघांच्या वर्चस्वाची नवी कहाणी आकार घेत आहे. चांदोली धरण सतत पोहत ‘तारा’ आणि ‘चंदा’ वाघिणींना आपल्या अधिपत्याखाली ठेवणारा ‘सेनापती’ (एसटीआर - टी 01) हा सह्याद्रीतील सर्वात प्रभावी नर वाघ आहे. मात्र आता त्याच्या साम्राज्याला ‘शिलेदार’ (एसटीआर - टी 09) या नव्या प्रतिस्पर्ध्याने हळूहळू सुरुंग लावण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.
काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गातून नैसर्गिकरित्या स्थलांतरित होऊन चांदोली राष्ट्रीय उद्यानात दाखल झालेला शिलेदार आता येथे स्थिरावण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र स्थिरावताना त्याने सेनापतीच्या विस्तीर्ण हद्दीतील काही भागावर आपली उपस्थिती ठळकपणे नोंदवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सह्याद्रीतील वाघांच्या भविष्यातील सत्तासंघर्षाची चर्चा वन्यजीव अभ्यासकांमध्ये रंगू लागली आहे.
शिलेदारचा इतिहासही तितकाच रंजक आहे. डिसेंबर 2024 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरातील कॅमेरा ट्रॅपमध्ये या निमवयस्क वाघाची छबी सर्वप्रथम टिपण्यात आली होती. त्यावेळी त्याला एसकेटी - 21 (सह्याद्री कोकण टायगर 21) हा सांकेतिक क्रमांक देण्यात आला होता. यापूर्वी हा वाघ नेमका कुठे होता, याची कोणतीही नोंद उपलब्ध नाही.
त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये त्याचे छायाचित्र राधानगरी वन्यजीव अभयारण्यात आढळले. मात्र त्यानंतर जवळपास वर्षभर हा वाघ वन विभागाच्या नजरेआड होता. या काळात तो राधानगरी परिसरात होता की सह्याद्रीच्या जंगल पट्ट्यात वावरत होता, याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. अखेर मार्च 2026 मध्ये हा वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानात आढळून आला आणि त्याच्या नव्या प्रवासाची नोंद झाली.
विशेष म्हणजे आंबोलीत प्रथम टिपला गेला तेव्हा काहीसा अशक्त दिसणारा हा वाघ आता मात्र पूर्णपणे बलदंड झाला आहे. चांदोलीच्या समृद्ध अधिवासात स्थिरावल्यानंतर त्याची शरीरयष्टी अधिक मजबूत झाल्याचे कॅमेरा ट्रॅपच्या नोंदींमधून स्पष्ट होत आहे. दुसरीकडे सेनापती मात्र तारा आणि चंदा या दोन्ही वाघिणींवर आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने चांदोली धरण पोहून या परिसरात वावरताना दिसत आहे.