देवराष्ट्रे : सागरेश्वर परिसरावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. निसर्गाच्या अद्भूत सौंदर्याने सागरेश्वर अभयारण्य नटले असून निसर्गाच्या विविध रूपांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा आणि पलूस तालुक्यांच्या हद्दीवर वसले असून अभयारण्याचे भौगोलिक क्षेत्र 10.87 चौ. कि.मी.आहे. उंचच उंच डोंगर -दर्या, पावसाळ्यात डोंगरावरून दर्यामध्ये खळखळत पडणारे पाणी, सदाबहार खुरटी झुडपे, हिरव्यागार वनराईत दूरवर पसरलेला गवताळ भाग, गवतावरती मनसोक्त फिरणारी मधूनच कावरी बावरी होणारी हरणे, गर्द वनराईत थुईथुई नाचणारे मोर आणि मधूनच मंदिरात होणारा घंटानाद... सारे वातावरण निसर्गानं भारावलेले आहे. सागरेश्वर अभयारण्य हे हरणांच्या विविध जातींसाठी प्रसिध्द आहे. याव्यतिरिक्त मोर, रानडुक्कर, ससा, साळिंदर, कोल्हा, लांडगा, तरस, घोरपड, विविध प्रकारचे साप, पक्ष्यांचे एकूण 155 प्रकार आढळतात. यामध्ये शहीन फालकॉन हा पक्षी सर्वात जास्त आढळतो. सागरेश्वर अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करणारे महान गुंड, किर्लोस्कर पॉईंट, झेड पॉईंट, फेटा उडवी पॉईंट, मृग विहार आणि लिंगेश्वर मंदिर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. पर्यटकांना राहण्यासाठी विश्रामगृहासह बांबू कुटीची सोय आहे, बालोद्यान आहे.
यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रेरणेने आणि वृक्षमित्र धों. म. मोहिते, मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या संकल्पनेतून साकार झालेले भारतातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य. 1972 च्या दुष्काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर अभयारण्याचा सागरेश्वर गेम रिझर्वमध्ये समावेश करण्यात आला. नंतर येथे हरणांचे पुनर्वसन करून अरण्यास सागरेश्वर वन्यजीव विभागात समाविष्ट करण्यात आले.