सांगली : डीजेला भारतातून हद्दपार केले पाहिजे. डीजेचे दुष्परिणाम स्पष्ट असतानाही त्याला परवानगी दिली जाते, हे चुकीचे आहे. डीजेला परवानगी देणाऱ्या पोलिस ठाण्यांवर कारवाई झाली पाहिजे. डीजेची मागणी करणाऱ्या गृह राज्यमंत्र्यांचा जन्म ‘इंडिया’त झाला आहे; मात्र ‘भारता’तील जनता लोककला आणि पारंपरिक वाद्यांच्या बाजूने आहे, असा टोला आ. सदाभाऊ खोत यांनी लगावला.
ते म्हणाले, सांगली जिल्हा लोककलांचा आणि कलाकारांचा आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक कला जपल्या आणि वाढवल्या पाहिजेत. डीजेला हद्दपार केले पाहिजे. डीजेमुळे अनेकांच्या कानाचे पडदे फाटले, अनेकांची हृदये बंद पडली. आजारी व्यक्तींना गावाबाहेर जावे लागत आहे. चार टपोरींच्या नादाला लागून डीजेला परवानगी देणे बंद झाले पाहिजे.
मुख्यमंत्रीही डीजेच्या विरोधात आहेत. लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. आम जनतेचा कौल घेतला तर ८० ते ९० टक्के लोक डीजेच्या विरोधात असल्याचे दिसेल. डीजे बंद झाला पाहिजे. पारंपरिक वाद्यांनी सण-उत्सव साजरे केले पाहिजेत. पारंपरिक वाद्यांवरही चांगल्या प्रकारे नाचता येते.
जुन्या वाद्यांना जपले पाहिजे : आ. पडळकर
आ. पडळकर म्हणाले, लेझीम, गजनृत्य, धनगरी ढोल, नाशिकचा ढोल, पुणेरी ढोल यासह जुनी वाद्ये, लोककला आणि लोकपरंपरा जतन करणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या सण-उत्सवांच्या निमित्ताने आधुनिकतेसोबत जुन्या वाद्यांनाही जपले पाहिजे. त्यांना लोकाश्रय मिळाला पाहिजे. सणांच्या चांगल्या कार्यक्रमांच्या निमित्ताने राजकारण करणे विरोधकांनी सोडले पाहिजे.