ग्रामीण भागातील कुस्ती  File Photo
सांगली

Sangli News : यात्रेतील कुस्ती मैदाने नवख्या मल्लांना आधार

शड्डू ठोकण्यासह चाचपणीची संधी; ग्रामीण भागात कुस्तीला बळ

पुढारी वृत्तसेवा

रजाअली पिरजादे

कडेगाव शहर : भरमसाट खर्चामुळे कुस्ती मैदानांची संख्या रोडावली आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या यात्रा-जत्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात होणाऱ्या मैदानात नवोदित मल्लांना क्षमता चाचपणीची आणि शड्डू ठोकण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुरस्कर्ते नसतानाही कुस्ती परंपरेला लोकवर्गणीतून बळ देण्याचे काम कौतुकास्पद म्हणावे लागेल.

महागाईच्या जमान्यात उत्तम मल्ल बनणे सोपे राहिलेले नाही. पैलवान होणे म्हणजे केवळ परिश्रम घेऊन व्यायाम करणे, कुस्ती खेळणे एवढेच नव्हे, तर त्यासोबत मल्ल होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे त्यांचा खुराक. जो प्रचंड महाग आहे. स्थानिक स्तरावर मल्लांची संख्या विविध कारणांनी रोडावली. त्यापैकी महागाई हे मुख्य कारण. याचबरोबर खेळण्यासाठी कमी झालेल्या मैदानांच्या संख्येचाही हा परिणाम. कारण, मैदानातून मिळणाऱ्या बिदागीतूनच पैलवानाच्या खुराकाच्या खर्चाला हातभार लागतो. दिवसेंदिवस मैदान भरविण्यासाठीचा खर्च लक्षणीय वाढल्याने अनेक प्रसिद्ध मैदाने इतिहासजमा झाली.

ग्रामीण भागात कुस्तीवर मनापासून प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी धीर सोडलेला नाही. यात्रांच्या निमित्ताने लोकवर्गणी आणि प्रसंगी पदरमोड करून ते कुस्तीची परंपरा जपण्यासाठी धडपडतात. यातून नवीन तरुण मल्लांना याचा मोठा आधार मिळतो. यात्रांची ही मैदाने फेब्रुवारी, मार्चपासून सुरू होतात. प्रत्येक मैदानात लहान गटाच्या 50 हून अधिक कुस्त्या होतात. म्हणजेच सुमारे शंभर ते सव्वाशे नवोदितांना शड्डू ठोकण्याची सुवर्णसंधी. त्यामुळे नवीन मल्लांना याचा मोठा लाभ होतो.

पूर्वी राजेशाहीच्या काळात राजे-महाराजे मल्लांना दत्तक घेत होते. स्वतः तालीम आणि पैलवान यांचा खर्च उचलत होते. लोकशाहीत शासनाने तालमींना आणि मल्लांना प्रोत्साहन व अनुदान देणे गरजेचे आहे. जत्रा, यात्रेच्या मैदानामुळे नवोदित मल्लांना अधिक ऊर्जा मिळते. त्यांना या मैदानातून डाव-प्रतिडावाचे धडे मिळतात. ग्रामीण भागात होणाऱ्या जत्रा-यात्रांनिमित्त कुस्ती मैदानाची परंपरा कायम आहे. ही परंपरा जोपासण्याबरोबरच नवोदित मल्लांना प्रोत्साहन मात्र खूप, खूप गरजेचे आहे.
- कमलाकर चौगुले, सदस्य, सांगली जिल्हा तालीम संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT