Sangli Politics 
सांगली

Sangli Politics : एक अकेला सब पर भारी

कवठेमहांकाळ तालुक्यात विरोधकांच्या महाएकजुटीचे मनसुबे उधळले

पुढारी वृत्तसेवा

दिलीप जाधव

कवठेमहांकाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणांगणात राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित आर. आर. पाटील यांना रोखण्यासाठी विरोधकांनी अक्षरशः महाएकजूट केली होती. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, माजी खासदार संजय पाटील, महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या माजी चेअरमन व जनसुराज्य पक्षाच्या नेत्या अनिता सगरे यांच्यासह भाजप आणि काँग्रेसने सुध्दा आमदार रोहित पाटील यांच्याविरोधात दंड थोपटले होते. एवढी सगळी ताकद लावून सुध्दा आमदार रोहित आर. आर. पाटील यांचा झंझावात रोखणे विरोधकांना जमले नाही.

आठपैकी पाच पंचायत समिती गण जिंकत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पंचायत समितीची सत्ता एकहाती काबीज केली. चारपैकी तीन जिल्हा परिषद गटांमध्ये आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांचे सर्व डाव उद्ध्वस्त केले. कवठेमहांकाळ तालुक्यात रोहित पाटील हे खऱ्या अर्थाने ‌‘एक अकेला, सब पे भारी‌’ ठरल्याचे चित्र ठळकपणे निकालानंतर समोर आले आहे.

ढालगाव जिल्हा परिषद गटात गेल्या निवडणुकीत ढालगाव पंचायत समिती गणाच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकलेले विकास हाक्के आणि रावसाहेब पाटील यांची जुनी राजकीय वैरभावना यंदाही कायम राहिली. जिल्हा परिषदेत पुन्हा आमने-सामने आलेल्या या दिग्गज लढतीत आमदार गटाचे विकास हाक्के यांनी घोरपडे गटाच्या रावसाहेब पाटील यांचा 1 हजार 306 मतांनी पराभव केला. नागज पंचायत समितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वामन कदम आणि घड्याळाच्या चिन्हावर मैदानात उतरलेले पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल शिंदे यांच्यात चुरशीची लढत रंगली. संभाजी ब्रिगेडचे ऋतुराज पवार यांच्या बंडखोरीमुळे समीकरणे ढवळून निघाली होती, मात्र वामन कदम यांनी 1 हजार 701 मतांच्या भक्कम आघाडीसह अनिल शिंदे यांचा पराभव केला. ढालगाव पंचायत समिती गणात आमदार रोहित पाटील गटाचे रविकिरण घागरे यांनीही जोरदार मुसंडी मारत घोरपडे गटाच्या ईश्वर पाटील यांना 1 हजार 816 मतांनी नमवून विजयाची तिरंगी पताका फडकावली.

कुची जिल्हा परिषद गटात कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि आमदार गटाचे दादासाहेब कोळेकर यांनी राष्ट्रवादीच्या इंद्रजित कोळेकर यांचा 2 हजार 523 मताधिक्याने पराभव केला. कुची पंचायत समिती गणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सिंधुताई पाटील यांनी घोरपडे गटाच्या सुलभादेवी पाटील यांच्यावर 2 हजार 537 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. पंचायत समितीच्या सभापती पदावर दावेदारी अधिक भक्कम केली आहे. कोकळे पंचायत समिती गणात आमदार रोहित पाटील गटाच्या वैशाली माने यांनी भारतीय जनता पक्षाच्या मीना ओलेकर यांचा 1 हजार 639 मताधिक्याने पराभव केला.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देशिंग जिल्हा परिषद गटात जोरदार धक्का बसला. पक्षाच्या उमेदवार रागिनीताई पाटील यांचा माजी खासदार संजय पाटील समर्थक गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता निवास पाटील यांनी तब्बल 3 हजार 331 मतांनी पराभव केला. मळणगाव पंचायत समिती गणातून मैदानात उतरलेले दिलीप जाधव यांचा घोरपडे गटाचे दिलीप झुरे यांनी 2 हजार 305 मताधिक्याने पराभव केला. देशिंग पंचायत समिती गणात आमदार गटाच्या संजना जगताप यांचाही घोरपडे गटाच्या प्रभावती निकम यांनी 1 हजार 37 मतांनी पराभव केला व घोरपडे गटाचा दबदबा पुन्हा एकदा सिध्द केला.

गेल्या तब्बल 40 वर्षांपासून अजितराव घोरपडे यांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जाणारा रांजणी जिल्हा परिषद गट यावेळी हादरला. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संजय बनसोडे यांनी घड्याळ चिन्हावर रिंगणात उतरलेल्या चंद्रकांत लोंढे यांचा 1 हजार 126 मतांच्या फरकाने पराभव केला. रांजणी पंचायत समिती गणातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रियांका गेंड यांनी भाजपच्या अक्षदा बंडगर यांचा 1 हजार 8 मतांनी पराभव केला. हिंगणगाव पंचायत समिती गणात घड्याळ चिन्ह घेऊन मैदानात उतरलेल्या अर्जुन कर्पे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सागर लोंढे यांचा 1 हजार 569 मतांनी पराभव केला.

राष्ट्रवादी (श.प.)ला 50 टक्के; महायुतीला 45 टक्के

जिल्हा परिषदेच्या चार गटात एकूण 82993 मतदान झाले. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 40 हजार 58 मते (48 टक्के), महायुतीला 38 हजार 434 मते (46 टक्के), तर इतरांना 4501 मते (5 टक्के) मिळाली. पंचायत समितींच्या आठ गणांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 41 हजार 156 मते (50 टक्के), महायुतीला 37 हजार 366 मते (45 टक्के), तर इतरांना 4471 (5 टक्के) मते मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT